गाणं पाहिजे तर असं, ज्यावर आजही पार्टीत लोक धरतात ठेका, 53 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
53 वर्षांपूर्वींचं प्रचंड रोमँटिक गाणं, ज्याशिवाय आजही कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही. आजही हे गाणं लागलं की लोक जागेवरच धरतात ठेका.

70च्या दशकातील बॉलिवूडमधील गाण्यांचा अंदाज आजच्या काळापेक्षा खूपच वेगळा होता. दमदार संगीत, ग्लॅमर आणि कलाकारांची हटके अदाकारी यामुळे त्या काळातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. असंच एक गाणं म्हणजे ‘हंगामा हो गया’. 1973 मध्ये आलेल्या या गाण्याने त्याकाळी लोकप्रियता मिळवली आणि तब्बल चार दशकांनंतर कंगना रनौतच्या ‘क्वीन’ चित्रपटातून नव्या अंदाजात पुन्हा प्रेक्षकांसमोर आलं.
1973 मध्ये ‘अनहोनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटातील ‘हंगामा हो गया’ हे गाणं त्यावेळी विशेष चर्चेत आलं होतं. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं, तर वर्मा मलिक यांनी गीत लिहिलं होतं.
मात्र गाण्याला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख मिळवून दिली ती अभिनेत्री बिंदू यांच्या दमदार परफॉर्मन्सने. त्या काळातील लोकप्रिय व्हॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिंदू यांचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त होता. ‘हंगामा हो गया’मध्ये त्यांचा कॅबरे अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स मूव्ह्ज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. गाणं चित्रपटापुरतं मर्यादित न राहता स्वतंत्रपणे लोकप्रिय झालं. आजही हे गाणं वाजलं की बिंदूंचा तो रेट्रो अंदाज अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
2014 मध्ये कंगनाने दिला नव्या पिढीचा टच
या गाण्याची कथा 2014 मध्ये पुन्हा चर्चेत आली. कंगना रनौतच्या ‘क्वीन’ चित्रपटात ‘हंगामा हो गया’ नव्या अंदाजात सादर करण्यात आलं. अमित त्रिवेदी यांनी या गाण्याला आधुनिक पार्टी वाइब दिली, तर आशा भोसले आणि अरिजीत सिंह यांनी त्याला आवाज दिला.
मूळ गाण्यात बिंदूंचा कॅबरे आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता, तर ‘क्वीन’मध्ये कंगना रनौतचा अंदाज अधिक बेफिकीर, मोकळा आणि मजेशीर होता. त्यामुळे जुन्या गाण्याला नव्या पिढीशी जोडण्याचं काम या आवृत्तीने केलं.
‘क्वीन’मध्ये कंगनाने साकारलेली राणी ही भूमिका तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचते. लग्न तुटल्यानंतर ती एकटी हनीमूनला जाते आणि या प्रवासात स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात करते.
त्यामुळे ‘हंगामा हो गया’च्या नव्या आवृत्तीत केवळ संगीत आणि सादरीकरण बदलले नाही, तर गाण्याचा संदर्भही बदलला. 1973 मध्ये ग्लॅमर आणि कॅबरेसाठी गाजलेलं हे गाणं 2014 मध्ये स्वातंत्र्य, बेफिकिरी आणि स्वतःचा आनंद शोधणाऱ्या राणीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलं.