या अभिनेत्याने 4.25 लाखात विकत घेतला बंगला, त्याच बंगल्याची लाकडे विकून कमावले 11.5 लाख रुपये, आज किंमत 500 कोटी
चाळीत राहणाऱ्या या अभिनेत्याने 4.25 लाख रुपयांमध्ये विकत घेतला बंगला. काही दिवसांनंतर तो पाडून 11.5 लाख रुपयांची विकली लाकडं. आज त्याची किंमत 500 कोटी रुपये.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनविश्वात मोठं स्थान निर्माण केलं. मात्र, त्यांच्या आयुष्यातील एका मालमत्तेची कहाणीही तितकीच रंजक आहे. मुंबईतील गिरगावच्या चाळीत एका छोट्याशा खोलीत कुटुंबासोबत राहणाऱ्या जितेंद्र यांनी एकेकाळी पाली हिलसारख्या उच्चभ्रू परिसरात बंगला खरेदी केला होता. विशेष म्हणजे, त्यांनी हा बंगला अवघ्या 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता. सुरुवातीला हा बंगला आपल्यासाठी अशुभ असल्याचा त्यांना संशय आला; पण कालांतराने हीच मालमत्ता त्यांच्या आयुष्यातील सर्वात फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक ठरली.
‘द रिअॅलिटी ड्राइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र यांनी या बंगल्याशी संबंधित आठवणी सांगितल्या. ‘बैजू बावरा’सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते भरत भूषण आर्थिक अडचणींचा सामना करत असताना त्यांनी जितेंद्र यांना पाली हिलमधील आपला बंगला विकण्याची ऑफर दिली होती.
त्या वेळी जितेंद्र गिरगावमधील चाळीत 20 बाय 10 फुटांच्या खोलीत आठ जणांसोबत राहत होते. त्यामुळे स्वतःचा बंगला खरेदी करणं ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. वडिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा बंगला 4.25 लाख रुपयांना खरेदी केला.
चार चित्रपट फ्लॉप झाल्याने मानू लागले बंगला अशुभ
बंगला खरेदी केल्यानंतर जितेंद्र आपल्या कुटुंबासह तिथे राहायला गेले. मात्र, त्यानंतर त्यांचे सलग चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यामुळे या बंगल्यामुळेच आपलं नशीब खराब झालं की काय अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली.
जितेंद्र यांनी वडिलांशी बोलताना भरत भूषण यांनीही हा बंगला विकल्याचं सांगितलं आणि आता आपल्यावरही तशीच वेळ आली असल्याची भीती व्यक्त केली. कारकीर्द सुरू होण्याआधीच संपेल अशी चिंता त्यांना वाटू लागली. अखेरीस त्यांनी कुटुंबासह हा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला.
बंगल्यातील लाकडातूनच मिळाले 11.5 लाख रुपये
काही वर्षांनंतर या मालमत्तेच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. बंगला पाडण्याच्या वेळी त्यात वापरलेल्या मौल्यवान ‘बर्मा टीक’ लाकडातूनच जितेंद्र यांना तब्बल 11.5 लाख रुपये मिळाले. विशेष म्हणजे, त्यांनी संपूर्ण बंगला 4.25 लाख रुपयांना खरेदी केला होता. त्यांनी त्या ठिकाणी ‘गौतम अपार्टमेंट्स’ची उभारणी केली. आज त्या जमिनीची किंमत 500 कोटी असल्याचं म्हटलं जातं.