डोक्यावर पदर घेऊन 3 सुनांनी केला डान्स, सर्वांनीच केलं प्रचंड कौतुक, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड
डोक्यावर पदर घेत तीन सुनांनी सादर केला जबरदस्त डान्स. शेवटपर्यंत खाली पडू दिला नाही पदर. डान्स पाहून चाहते देखील झालेले थक्क. सर्वांनीच केलेलं कौतुक. आता व्हिडीओ होतोय व्हायरल.

आपल्या देशात टॅलेंटची काहीच कमी नाही. विविध रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून देशभरातील अनेक कलाकारांचं अनोखं आणि भन्नाट टॅलेंट प्रेक्षकांसमोर येत असतं. असाच एक मजेशीर आणि थक्क करणारा डान्स परफॉर्मन्स सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मधील ‘पल्लू गर्ल्स’चा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या ग्रुपमधील तिघींची खासियत म्हणजे त्यांनी डोक्यावर पदर घेत साडीमध्ये जबरदस्त डान्स केला. विशेष म्हणजे अवघड डान्स स्टेप्ससोबतच त्यांनी स्टेजवर चक्क फ्लिप्सही करून दाखवल्या. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांसह शोचे परीक्षकही आश्चर्यचकित झाले.
‘जवानी जानेमन’वर भन्नाट डान्स
‘पल्लू गर्ल्स’ने ‘जवानी जानेमन’ या लोकप्रिय गाण्यावर हा दमदार परफॉर्मन्स सादर केला. स्टेजवर तिघींनी डोक्यावर पदर घेत एंट्री केली आणि त्यानंतर त्यांच्या डान्सला सुरुवात झाली. साडी आणि पदर सांभाळत त्यांनी केलेले डान्स मूव्ह्ज पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्साह दिसून आला.
त्या काळात शोमध्ये किरण खेर, करण जोहर आणि मलायका अरोरा हे परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. परफॉर्मन्स सुरू होताच तिघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू उमटलं. मात्र ‘पल्लू गर्ल्स’ने शेवटपर्यंत आपल्या चेहऱ्यावरचा पदर हटवला नाही. त्यामुळे त्या मुली आहेत की मुलं, याचा अंदाज लावणंही परीक्षकांना कठीण झालं.
पदर न हटवताच जिंकलं जजेसचं मन
परफॉर्मन्सदरम्यान ‘पल्लू गर्ल्स’ने केवळ नृत्यच केलं नाही तर अनेक धाडसी फ्लिप्स करून दाखवत सर्वांना थक्क केलं. त्यांच्या या भन्नाट सादरीकरणाचं परीक्षकांनी कौतुक केलं आणि त्यांची पुढील फेरीसाठी निवडही करण्यात आली. मात्र त्यांची ओळख शेवटपर्यंत एक गूढच राहिली.
1982 मधील गाणं आजही लोकप्रिय
‘जवानी जानेमन’ हे गाणं 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमक हलाल’ या चित्रपटातील आहे. अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते तर बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलं होतं. आशा भोसले यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रचंड गाजलं. अभिनेत्री परवीन बाबी यांच्या ग्लॅमरस अंदाजामुळे गाण्याला आणखी रंगत आली.
आजही ‘जवानी जानेमन’ हे गाणं संगीतप्रेमींच्या आवडीचं आहे. त्यावर ‘पल्लू गर्ल्स’ने सादर केलेला अनोखा डान्स मात्र त्यांच्या भन्नाट टॅलेंटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.