टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खुलासा

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया. थेट पूर्वीच्या देखील घटणांचा उल्लेख करत केला अनेक गोष्टींचा खुलासा. नेमकं काय म्हणाले?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खुलासा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 19, 2026 | 7:21 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी रात्री मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी रेहानच्या वडिलांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला आहे. त्याला जी काही शिक्षा मिळेल, ती योग्यच असेल. त्याला अटक करण्यात आली तेही योग्य आहे’ असे रेहानचे वडील रईसुद्दीन यांनी म्हटले आहे.

रईसुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा रेहान यापूर्वी अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. या प्रकरणात तो सध्या जामिनावर बाहेर होता. रेहानने नववीपर्यंत शिक्षण घेतले असून, अनेक वर्षांपूर्वीच त्याने घर सोडले होते असेही त्याच्या वडिलांनी सांगितले.

Loading...

रईसुद्दीन हे रोजंदारीवर काम करतात. त्यांनी सांगितले की, रेहान गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नाही. तो देवडू गावात आपल्या आईसोबत राहत होता. टायगर श्रॉफवरील गोळीबाराची माहिती त्यांना सकाळी प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली.

नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न?

राजस्थानमधील कोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन संशयितासह काही संशयितांना सोमवारी कोटा शहरात पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. हे संशयित नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

प्राथमिक चौकशीत रेहानचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित साथीदार अनिल पंडित याच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याची आणि आरोपींच्या कथित संबंधांची पुष्टी तपासातून होणे आवश्यक आहे.

जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात तीन हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. या घटनेत अभिनेता थोडक्यात बचावला. मात्र, त्याच्या कारचा चालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अभिनेत्याच्या कारच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींची पार्श्वभूमी, हल्ल्यामागील हेतू आणि संभाव्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us