Tiger Shroff Net Worth: बिष्णोई गँगच्या रडारवर असलेल्या टायगर श्रॉफकडे किती संपत्ती? आकडे पाहून व्हाल थक्क!
Tiger Shroff Net Worth: लॉरेन्स बिष्णोई गँगच्या रडारवर असलेल्या टायगर श्रॉफकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपट, जाहिराती आणि फिटनेसशी संबंधित व्यवसायातून त्याची कमाई होते.

Tiger Shroff Net Worth: अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार अॅक्शन, डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असलेल्या टायगरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, त्याची बहीण कृष्णा श्रॉफ हिने अभिनयापासून दूर राहून फिटनेस आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. दोघेही आलिशान जीवनशैलीसाठी चर्चेत असतात. मात्र, टायगर आणि कृष्णा यांच्या संपत्तीची तुलना केली, तर कोण अधिक श्रीमंत आहे? यासंदर्भातील आकडे सध्या चर्चेत आहेत.
टायगर श्रॉफची संपत्ती
‘एबीपी लाइव्ह’ने दिलेल्या माहितीनुसार, टायगरची संपत्ती सुमारे 248 कोटी रुपये आहे. चित्रपट, जाहिराती, फिटनेसशी संबंधित व्यवसाय आणि मालमत्तांमधून त्याला उत्पन्न मिळत असल्याचं सांगितलं जातं. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 2014 मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर ‘बागी’ फ्रँचायझी, ‘वॉर’ आणि इतर चित्रपटांमधून त्याने अॅक्शन हिरो म्हणून लोकप्रियता मिळवली.
टायगरच्या आलिशान जीवनशैलीचीही नेहमी चर्चा होते. मुंबईतील खार परिसरात त्याचं आठ बेडरूम असलेलं अपार्टमेंट आहे. याशिवाय पुण्यातील त्याच्या बंगल्याची किंमत सुमारे 7.5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. या मालमत्तेतून त्याला दरमहा भाडंही मिळतं. त्याच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू, बेंटले आणि 1939 मधील विंटेज जग्वार एसएस100 यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
कृष्णा श्रॉफही कमाई
टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ हिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी व्यवसाय, फिटनेस आणि सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केलं आहे. ती उद्योजिका, चित्रपट निर्मितीशी संबंधित व्यक्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. तिच्या फिटनेसविषयक आवडीमुळेही ती चर्चेत असते. मनोरंजन क्षेत्रातील रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.
‘कोईमोई’ने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा श्रॉफची संपत्ती सुमारे 41 कोटी रुपये आहे. तिच्याकडे हमर एच2, मर्सिडीज-बेंझ जी-क्लास आणि बीएमडब्ल्यू 5 सीरिज यांसारख्या आलिशान गाड्या असल्याचंही कळतंय. टायगर श्रॉफची संपत्ती 248 कोटी रुपये, तर कृष्णा श्रॉफची संपत्ती 41 कोटी रुपये आहे. म्हणजेच या अंदाजांनुसार टायगरची संपत्ती कृष्णाच्या तुलनेत जवळपास सहापट आहे.
टायगर श्रॉफ सध्या कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई गँगच्या रडारवर असून मुंबईतील जुहू परिसरात त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत टायगरला कोणतीही दुखापत झाली नसून तो सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.