इथे आयकर विभागाचे छापे, तिथे बिघडली प्रसिद्ध निर्मात्याची तब्येत; थेट रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्याशी संबंधित ठिकाणी मुंबईत आयकर विभागाने छापेमारी केली होती.

इथे आयकर विभागाचे छापे, तिथे बिघडली प्रसिद्ध निर्मात्याची तब्येत; थेट रुग्णालयात दाखल
वाशु भगनानी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 1:40 PM

Vashu Bhagnani: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना लंडनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मुंबईत त्यांच्या आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंहशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशू भगनानी सध्या लंडनमध्ये असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास झाला किंवा त्यांच्या प्रकृतीची स्थिती किती गंभीर आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वृत्तसंस्था ANI ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गोपनीयता राखण्याची विनंती केली असून सध्या एकटं राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे.

वाशू भगनानी यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी मुंबईत आयकर विभागाने 12 ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. या कारवाईचा संबंध वाशू भगनानी, त्यांची सून आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तसंच पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित ठिकाणांशी आहे. या तपासामागे चित्रपट प्रकल्पांशी संबंधित कथित विदेशी आर्थिक व्यवहार असल्याचं समजतंय. अधिकाऱ्यांकडून चित्रपटांचं शूटिंग, परदेशातील वितरण आणि निर्मितीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची कागदपत्रं तपासली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...

वाशू भगनानी यांनी 1995 मध्ये पूजा एंटरटेनमेंटची सुरुवात केली. त्याच वर्षी गोविंदाच्या ‘कुली नंबर 1’ चित्रपटातून त्यांनी निर्माता म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ‘हीरो नंबर 1’, ‘बीवी नंबर 1’, ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांशी त्यांचं नाव जोडलं गेलं. नंतरच्या काळात त्यांनी ‘सरबजीत’, ‘बेल बॉटम’ आणि अक्षय कुमार-टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बड़े मियां छोटे मियां’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा मुलगा जॅकी भगनानीसोबतही ते प्रॉडक्शनच्या कामात सक्रिय आहेत.

दरम्यान, पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित ठिकाणांचाही तपास झाल्याचं वृत्त आहे. या कंपनीशी ‘दृश्यम’ फ्रँचायझीचाही संबंध आहे आणि ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us