Vidya Balan: आता AI नेच मुलं जन्माला घाला..; विद्या बालन संतापली; कोणाला सुनावलं?
Vidya Balan: सतत एआय, एआय करता ना, मग AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या, अशा शब्दांत अभिनेत्री विद्या बालनने तिचा संताप व्यक्त केला आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

Vidya Balan: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या अभिनयामुळे नाही, तर सोशल मीडियावर सुरू असलेल्या बॉडी शेमिंगमुळे चर्चेत आहे. आई झाल्यानंतर तिच्या शरीरात झालेल्या बदलांवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. यावर आता अभिनेत्री विद्या बालनने संताप व्यक्त करत ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. ‘महिलांना मुलं झाल्यानंतर त्यांचं वजन वाढत असेल, तर AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या’, अशा शब्दांत विद्याने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. तिच्या या वक्तव्याची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे. ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विद्या बालनने ऑनलाइन ट्रोलिंग आणि महिलांच्या शरीरावर केल्या जाणाऱ्या टीकेवर आपलं मत मांडलं.
ऑनलाइन ट्रोलर्सना उत्तर देताना विद्या बालन म्हणाली, “ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. जे लोक इतरांची निंदा करतात, त्यांनी आधी स्वतःला आरशात पाहायला हवं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुठेतरी हे लोक स्वतःवरच नाराज आहेत आणि त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. त्यामुळेच ते इतरांमध्ये दोष शोधत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे, महिलांना मुलांना जन्म दिल्यानंतर वजन वाढतं, याचा तुम्हाला इतकाच त्रास होत असेल, तर सतत AI, AI करता ना, मग AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या.”
विद्या पुढे म्हणाली, “प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. एखाद्याच्या शारीरिक दिसण्यावरून त्याची थट्टा करण्याचा किंवा त्याला ट्रोल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही.” कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीनंतरच्या लूकवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. सार्वजनिक ठिकाणी पती विकी कौशलसोबत दिसल्यानंतर तिच्या वजनावरून काही नेटकऱ्यांनी टीका केली. मात्र, आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, याकडे विद्याने लक्ष वेधलं.
महिलांनी आई झाल्यानंतर कसं दिसावं, त्यांचं वजन किती असावं किंवा त्यांनी किती लवकर पूर्वीसारखा फिटनेस मिळवावा, याचे नियम ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. एखाद्या महिलेच्या शरीरावरून तिची खिल्ली उडवण्याचा अधिकार ट्रोलर्सना कोणी दिला, असा सवालही विद्याने उपस्थित केला. तिच्या मते, मातृत्वानंतर होणारे शारीरिक बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे. विद्या बालनने यापूर्वीही स्वतःच्या वजनावरून झालेल्या टीकेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. तिच्या वजनाची एकेकाळी सार्वजनिक चर्चेचा विषय म्हणून खिल्ली उडवली जात होती. मात्र, कालांतराने तिने स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.