Tiger Shroff: ..मग तुम्हीच गुन्हेगार; टायगरवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर संतापला अभिनेता, जॅकी श्रॉफ यांचीही कमेंट
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर हल्ला होत असताना फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना अभिनेता विद्युत जामवालने चांगलंच झापलं आहे. विद्युतच्या या व्हिडीओवर आता टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर अभिनेता विद्युत जामवाल याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. टायगरला धीर देतानाच विद्युतने या घटनेवेळी उपस्थित असलेल्या चाहत्यांना आणि बघ्यांची भूमिका घेणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर हल्ला होत असताना केवळ प्रेक्षक बनून राहण्याऐवजी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन त्याने केलं आहे. विद्युतच्या या व्हिडीओची सध्या चर्चा होत असून, टायगरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विद्युत जामवालने व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफचं कौतुक करत त्याला धीर दिला. तो म्हणाला, “मला टायगर श्रॉफसाठी काहीतरी बोलायचं आहे. तू सर्वांत निडर व्यक्ती आहेस. मी जितक्या लोकांना ओळखतो, त्या सर्वांमध्ये तू खूप निडर आहेस.” यावेळी त्याने फुटबॉल पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनाही प्रश्न विचारला. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपण टायगरचे मोठे चाहते असल्याचं सांगितलं असेल, तर मग संकटाच्या वेळी त्याच्यासाठी पुढे येण्याची तयारी का दाखवली नाही, असा सवाल त्याने केला. केवळ एखाद्या कलाकारावर प्रेम असल्याचं सांगून उपयोग नाही, तर गरजेच्या वेळी कृतीतूनही ते दिसायला हवं, असा संदेश विद्युतने दिला.
विद्युतने आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमधूनही समाजातील बघ्यांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या देशात अनेक घटना घडत असतात. काही वेळा आपण आवाज उठवू शकतो, तर काही वेळा परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. मात्र, रस्त्यावर एखाद्या महिला किंवा पुरुषाचा छळ होताना अथवा त्यांच्यावर हल्ला होताना आपण केवळ उभं राहून बघत का राहतो, असा सवाल त्याने केला. अशा वेळी केवळ साक्षीदार बनून न राहता माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचं विद्युतने म्हटलं.
पहा व्हिडीओ-
या व्हिडीओमध्ये विद्युतने मुंबई पोलिसांनाही उद्देशून भाष्य केलं. टायगरला सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं असलं, तरी अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असं त्याने म्हटलं. मला मुंबई पोलिसांनाही हे बोलायचं आहे की, अर्थात तुम्ही टायगरला सुरक्षा पुरवणार, पण अशी घटना पुन्हा कधीच घडली नाही पाहिजे. अशा प्रकारची चूक पुन्हा झाली तरी, मग तुम्हीच गुन्हेगार आहात, असं विद्युत पुढे म्हणाला. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित होतील, असा इशाराही त्याने दिला. व्हिडीओच्या शेवटी विद्युतने टायगरसोबतचं भावनिक नातं व्यक्त केलं. दोघांच्याही आवडीचा ‘बजरंग बाण’ ऐकत राहण्याचा सल्ला देत त्याने टायगरला प्रेमाने संदेश दिला. “आय लव्ह यू भाई,” असं म्हणत त्याने टायगरला पाठिंबा दर्शवला.
विद्युतच्या या व्हिडीओवर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘स्टे ब्लेस्ड भिडू’ अशी कमेंट करत विद्युतच्या भावना आणि त्याच्या पाठिंब्याला प्रतिसाद दिला. टायगरवरील हल्ल्यानंतर विद्युतने केवळ मित्राला आधार दिला नाही, तर सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांच्या जबाबदारीचाही मुद्दा उपस्थित केला आहे.