19 हजार मुलींना पछाडून मिळवली पहिली फिल्म, 2 सुपरहिट सिनेमे दिले अन् अचानक सोडली इंडस्ट्री; आता काय करते ही अभिनेत्री ?
आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, तिला पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. दुसरा चित्रपटही हिट ठरला, मात्र अवघ्या 3 चित्रपटानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम केल.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अगदी कमी वयातच आपल्या अभिनयाने, कामाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यापैकीच एक नाव आहे अभिनेत्री जायरा वसीम हिचं. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरूवात करणाऱ्या जायराने पहिल्याच चित्रपटातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं काम, अभिनय याचं खूप कौतुक झालं आणि तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. अनेकांना ही गोष्ट कदाचित माहीत नसेल पण या चित्रपटासाठी जायराने तब्बल 19 हजार मुलींसोबत ऑडिशन दिली होती आणि नशीबाने ही भूमिका तिच्या पारड्यात पडली. हा चित्रपट म्हणजे जायरासाठी एक सुवर्णसंधी होता, ती यशस्वी करण्यासाठी तिने जीवापाड मेहनत केली. त्यामुळेच तिने पहिल्या चित्रपटातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
यानंतर जायराने ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात काम केलं. दंगल नंतर हा चित्रपटही सुपरहिट ठरला. नंतर झायराने ‘द स्काय इज पिंक ‘ फिल्ममध्ये प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केलं खरं पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट फार यशस्वी ठरला नाही, मात्र ओटीटीवर तो खूप चालला. जायराचं करिअर वेगाने पुढे जात होतं, पण तिने अचानक एक धक्कादायक निर्णय घेतला. तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचं ठरवलं.
26 वर्षांच्या झायराला कमी वयात मिळाली लोकप्रियता
जायरा वसीमचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 साली जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये झाला. तिने काश्मीरमध्ये सुरूवातीचं शिक्षण घेतलं. तिला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. शाळेत शिकत असतानाच तिला हे टॅलेंट दाखवण्याची संधि मिळाली आणि तिथूनच तिचा फिल्मी जगातकडचा प्रवास सुरू झाला. एका मुलाखतीत झायराने सांगितलं की ती आठवीत असताना तिने एका नाटकात भाग घेतला. ती चांगला अभिनय करू शकते, हे तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्याही लक्षात आलं. नंतर काश्मीरमध्ये एक कास्टिंग डिरेक्टर आल्यावर, प्रिन्सिपलनेजायराचं नाव सुचवलं. त्यानंतर तिला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने मायक्रोसॉफ्टचा मोबाईल तसेच टाटा स्काय सारख्या ब्रँडसाठी काम करायची संधी मिळाली.
दंगलने मिळाली मोठी संधी
2016 साली जायरा वसीमच्या करिअरला सर्वात मोठं वळण मिळालं, जेव्हा तिला आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट कुस्तीपटू महावीर सिंह फोगाट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात जायरा वसीमने बालपणीच्या गीता फोगाटची भूमिका साकारली होती. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि मेहनतीने तिने ही भूमिका पडद्यावर जिवंत केली. त्यामुळे अगदी कमी वयातच ती लोकप्रिय झाली.
‘दंगल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी जायरा वसीमला 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. इतक्या कमी वयात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणं ही तिच्या करिअरमधील मोठी कामगिरी होती. ‘दंगल’च्या यशानंतर जायरा वसीम 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटातही तिच्यासोबत आमिर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात जायराने इन्सिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. गायिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इन्सियाला कौटुंबिक बंधनांमुळे आपली स्वप्नं पूर्ण करता येत नाहीत, अशी या चित्रपटाची कथा होती. जायराने आपल्या अभिनयातून इन्सियाचं पात्र प्रभावीपणे साकारलं. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनीही कौतुक केलं आणि हा चित्रपट यशस्वी ठरला.
चर त्यानंतर 2 वर्षांनी 2019 साली जायरा वसीम ही प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्यासोबत ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली. हा तिच्या कारकिर्दीतील तिसरा महत्त्वाचा चित्रपट होता. यामध्ये तिने आयशा चौधरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं. मात्र, याच वर्षी तिने असा निर्णय घेतला, ज्यामुळे मनोरंजनविश्वासह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
फिल्म इंडस्ट्रीला केलं अलविदा
जायराने सोशल मीडियावर एक भलीमोठ्ठी पोस्ट शेअर करत चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर आपलं धर्माशी आणि ईमानाशी असलेलं नातं प्रभावित होत असल्याचं तिला जाणवलं, असं तिने या पोस्टमध्ये नमूद केलं. आपण करत असलेल्या कामामुळे जायरा समाधानी नव्हती. तसेच, हा मार्ग आपल्याला इस्लामपासून दूर नेत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या धार्मिक श्रद्धांनुसार जायराने चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
तिच्या या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर बरीच, उलटसुलट चर्चा झाली, काहींनी तिच्या या निर्णयाचं समर्थन केल, तर अनेकांनी या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केलं. मात्र, जायरा आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतरही जायरा वसीम सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्रामवर अनेकदा मोटिव्हेशनल कोट्स आणि सुविचार शेअर करत असते. गेल्या वर्षी , म्हणजेच 2025 मध्ये तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिच्या लग्नाबद्दल माहिती दिली.