कोलेस्ट्रॉल नॉर्मल असलं तरीही हार्ट अटॅकचा धोका असतो का? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची कारणं
हृदयविकाराचा संबंध खराब कोलेस्ट्रॉलशी आहे. अगदी तरुण आणि फिट लोकांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्ट्रॉल सामान्य असतानाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, हे जाणून घ्या.

हार्ट अटॅक ही एक अशी आरोग्य समस्या आहे, जी हृदयाच्या स्नायूंच्या एका भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबल्यावर उद्भवते. यामागे खराब कोलेस्ट्रॉल हे कारण मानले जाते. जर शरीरात त्याची पातळी वाढली, तर ते तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. हे अनहेल्दी फॅट धमन्यांच्या भिंतींवर प्लाकच्या रूपात जमा होऊ लागते. यामुळे धमन्या अरुंद होऊ शकतात आणि रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) चा धोका वाढतो. मात्र ज्या लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी निरोगी आणि सामान्य असते, त्यांनाही हार्ट अटॅक येऊ शकतो का? चला, तज्ञांकडून जाणून घेऊया.
बॅड कोलेस्ट्रॉलला LDL (लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन) म्हणतात. हे फॅट आणि प्रोटीनचे मिश्रण असते जे रक्तात मिसळते. एलडीएलची पातळी १०० पेक्षा कमी असल्यास ती चांगली, १०० ते १२९ असल्यास सरासरी, १३० ते १५९ असल्यास सीमारेषेवरील आणि १६० असल्यास हाय कोलेस्ट्रॉल मानली जाते. आता आपण जाणून घेऊया की सामान्य कोलेस्ट्रॉलमुळे देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का.
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका केव्हा असतो?
कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असली तरी हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे टळत नाही, असे तज्ञ सांगतात. केवळ कोलेस्ट्रॉल रिपोर्टच्या आधारावर हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करता येत नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा, तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कुटुंबातील हृदयविकाराचा इतिहास यांसारखे इतर अनेक घटक देखील हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात.
कोलेस्ट्रॉल नॉर्मल झाल्यावर हार्ट अटॅकचा धोका किती?
तज्ञांच्या मते, दीर्घकाळ वाढलेले एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास कारणीभूत ठरू शकते. जरी नंतर आहार, व्यायाम किंवा औषधोपचाराने कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य झाली, तरीही धमन्यांमध्ये असलेला प्लाक तसाच राहू शकतो. कधी कधी, हा प्लाक अचानक फुटतो आणि रक्ताची गुठळी तयार होते, ज्यामुळे हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
याकडे दुर्लक्ष करू नका
कोलेस्ट्रॉलच्या सामान्य पातळीकडे दुर्लक्ष करू नये. रक्तदाब, रक्तातील साखर आणि इतर जोखमीच्या घटकांवर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यामुळे हृदयरोगाचे लवकर निदान होण्यास आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
अशा प्रकारे ठेवा हृदय निरोगी
हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. जंक फूड, पॅकेज्ड फूड, मीठ, साखर आणि अनहेल्दी फॅटयुक्त पदार्थ टाळा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. नियमित शारीरिक हालचाल आणि वजन नियंत्रणात ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
या लक्षणांकडे लक्ष द्या
छातीत अचानक वेदना किंवा दाब जाणवणे असेल, धाप लागण्यासोबत अचानक घाम येत असेल, छातीत दुखणे हातांपर्यंत आणि जबड्यापर्यंत पसरत असेल अशी लक्षणे दिसल्यास, तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.