चिया सीड्स की फ्लेक्स सीड्स? हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या

हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. चिया सीड्स आणि जवसाच्या बिया या दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. मात्र, हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोघांपैकी कोणते अधिक उपयुक्त आहे आणि त्यांचे नेमके फायदे काय आहेत, जाणून घेऊया.

चिया सीड्स की फ्लेक्स सीड्स? हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या
चिया सीड्स की फ्लेक्स सीड्स? हृदयाच्या आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर?
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 12:51 PM

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याकडे अनेक जण लक्ष देतात. चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स हे दोन्ही पर्याय सध्या लोकप्रिय असून त्यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक आढळतात. मात्र, हृदयाचं आरोग्य जपण्याचा विचार केला तर या दोन्ही बियांपैकी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. चिया सीड्समध्ये फायबर आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात, तर जवस प्लांट बेस्ड ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि लिग्नन्स या घटकांसाठी ओळखले जाते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोन्ही बियांचे फायदे काय आहेत आणि त्यांच्यात नेमका कोणता फरक आहे, हे जाणून घेऊया.

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स

Loading...

चिया सीड्समध्ये अल्फा-लिनोलेनिक ॲसिड (ALA) नावाचं प्लांट बेस्ड ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतं. हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. तर जवसाच्या बियांमध्येही ALA मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय, त्यामध्ये लिग्नन्स नावाचे वनस्पतीजन्य घटक असतात, ज्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. साधारण २८ ग्रॅम चिया सीड्समधून ५ ग्रॅम, तर तेवढ्याच जवसाच्या बियांमधून सुमारे ६ ग्रॅम ALA मिळतं.

कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब

चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स या दोन्हींमध्ये फायबर असतं. विशेषतः विरघळणारे फायबर शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतं. जवसाच्या बियांवर करण्यात आलेल्या काही अभ्यासांमध्ये कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबामध्ये थोडी सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे. चिया सीड्सवरही संशोधन झालं आहे; मात्र हृदयाच्या आरोग्यासाठी त्यांचे फायदे सिद्ध करणारे पुरावे अद्याप मर्यादित आणि संमिश्र आहेत. केवळ या बिया खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळत नाही. रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणं, तसेच धूम्रपान टाळणंही महत्त्वाचं आहे.

आहारात चिया सीड्स आणि जवसाचा समावेश कसा करावा?

चिया सीड्स आणि जवसाच्या बिया या दोन्हींचा समावेश रोजच्या संतुलित आहारात करता येतो. तुम्ही या बिया दलिया, दही, स्मूदी किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. चिया सीड्स पाणी किंवा इतर द्रवपदार्थांमध्ये भिजवून खाणं अधिक चांगलं मानलं जातं. हृदयाच्या आरोग्यासाठी दोन्ही बिया चांगले पर्याय आहेत. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि आहाराच्या गरजेनुसार त्यांचा समावेश करता येतो.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us