
नवी दिल्ली – तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीमुळे (bad breath) त्रस्त आहात का? एखाद्या व्यक्तीशी बोलताना असे वाटत असेल तर ते तुमच्यासाठी तसेच समोरच्या व्यक्तीसाठीही चांगले नाही. श्वासातून येणारा दुर्गंध ही समस्या बहुतांश लोकांमध्ये उद्भवते, विशेषतः थंडीत हा त्रास जास्त जाणवतो. ॲसिडिटी (acidity),मधुमेह, खराब दात, डिहायड्रेशन, फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे किंवा धूम्रपान (smoking) केल्यामुळेही ही समस्या जाणवू शकते. मात्र काही सोप्या उपायांचा अवलंब करून हा त्रास दूर करता येऊ शकतो.
1) मौखिक आरोग्य चांगले राखा :
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी, कडुनिंब आणि बाभूळ यांसारख्या आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेल्या डेंटल पावडरचा वापर करावा. तसेच त्रिफळा घातलेल्या काढ्याने गुळण्या कराव्यात. यामुळे दुर्गंधाचा त्रास कमी होईल.
2) संतुलित आहार घ्या :
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर संतुलित आहार घ्या. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, त्यामुळे भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवा. जेवल्यानंतर कडू आणि तुरट पदार्थांचे सेवन करावे, यामुळे जंतूंचा त्रास होणार नाही.
3) ॲसिड रिफ्लेक्सही ठरू शकते कारण :
तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर त्यामुळेही श्वासाला दुर्गंध येऊ शकतो. ॲसिड रिफ्लेक्स हे देखील एक कारण ठरू शकते. ॲसिड रिफ्लेक्स हा एक जुनाट आजार आहे. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नीट उपचार करून घ्यावेत ज्याने हा त्रास दूर होऊ शकतो.
4) बडीशेपेचा वापर करा :
श्वासाचा दुर्गंध घालवण्यासाठी बडीशेपेचा वापर करणे हा एक जुना पण तितकाच प्रभावी उपाय आहे. जेवणानंतर बडीशेप खाल्याने श्वासाला येणारा दुर्गंध कमी होऊ शकतो.
5) मधुमेह आणि लिव्हर इन्फेक्शनमध्ये घ्यावी विशेष काळजी :
प्रत्येक उपाय केल्यानंतरही तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधाचा त्रास होत असेल तर त्याचे कारण समजून घ्यावे. कारण कधीकधी मधुमेह आणि लिव्हरच्या (यकृत) इन्फेक्शनमुळेही हा दुर्गंध येऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान करणे टाळावे व डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)