
शनिवारी सकाळी इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला सुरू केला, ज्यामुळे नव्या युद्धाला तोंड फुटले आहे. या हल्ल्यात अमेरिकेनेही इस्रायलच्या बाजूने उडी घेतली असून, दोन्ही देशांनी इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला असून, त्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचाही समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. आता त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला चला जाणून घेऊया…
अमेरिका-इस्रायलने खामेनेई यांना कसे ठार मारले?
शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर व्यापक हल्ला केला. इस्रायलने या मोहिमेला ‘रोअरिंग लायन’ (Roaring Lion) आणि अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) असे नाव दिले होते. हा हल्ला थेट तेहरानमधील खामेनेई यांच्या निवासस्थान आणि कार्यालयासह एकूण ३० हून अधिक ठिकाणी करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी खामेनेई हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत मुख्यालयात बैठक घेत होते. त्याच क्षणी हा प्रहार झाला.
इस्रायली लढाऊ विमानांनी इराणमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक केली, ज्यात खामेनेई यांच्या निवासस्थानासह इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आले. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इस्रायली विमानांनी खामेनेई यांच्या परिसरावर एकाच वेळी तब्बल ३० बॉम्ब टाकले. या भीषण हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश असल्याचे काही अहवाल सांगतात.
कोणता बॉम्ब वापरला गेला?
खामेनेई यांच्या निवासस्थानावर नेमका कोणता बॉम्ब वापरला गेला, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र, प्राथमिक अहवाल आणि तज्ज्ञांच्या मते, इस्रायलने अत्यंत प्रगत बंकर-बस्टर (Bunker-buster) बॉम्बचा वापर केला असावा. खामेनेई यांचे निवासस्थान अत्यंत मजबूत आणि सुरक्षित बंकरसारखे असल्याने, सामान्य बॉम्ब प्रभावी ठरले नसते. हल्ला इतका तीव्र होता की, खामेनेई यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला, अशी माहिती काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर आणि व्हिडिओ संदेशात या घटनेची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, “इतिहासातील सर्वात क्रूर आणि दुष्ट व्यक्तींपैकी एकाचा अंत झाला आहे.” खामेनेई हे अमेरिकेच्या “इंटेलिजन्स आणि अत्यंत प्रगत ट्रॅकिंग सिस्टम” पासून वाचू शकले नाहीत, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, खामेनेई यांना ठार मारून अमेरिकेने इराणी जनतेला न्याय दिला आहे आणि हे इराणी लोकांसाठी नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे.