
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्काराची मागणी केली. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवला, त्यांचे नोबेलसाठी नामांकन झाले पाहिजे, असे मुनीर यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते एना केली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
व्हाइट हाऊसचे प्रवक्ते एना केली यांनी म्हटले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पसाठी शांततेच्या नोबेलचे नामांकन देण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना व्हाऊट हाऊसमध्ये लंचसाठी बोलवले होते. ही भेट १८ जून रोजी व्हाऊट हाऊसच्या कॅबिनेट रुममध्ये झाली. त्यात माध्यमांना सहभागी होण्याची परवानगी नव्हती.
ट्रम्प-मुनीर यांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35 मिनिटे ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेतही मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो तणाव झाला होता, तो दूर करण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराने संवाद साधला. तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थात या तणाव दरम्यान झाली नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले की, भारत आपल्या द्विपक्षीय मुद्यांवर तिसऱ्या पक्षाची मध्यस्था कधीही स्वीकारणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी थांबवला. भारतानेही अनेक वेळा ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. दोन्ही देशांच्या संघर्षात तिसऱ्या देशाची मध्यस्था स्वीकारण्यात आली नाही आणि भविष्यातही स्वीकारण्यात येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानमधील ९ लष्करी तळ नष्ट केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हल्ला भारताने परतवून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने चर्चेसाठी पुढाकार घेत शस्त्रसंधी केली होती.