विनाश… विनाश… विनाश… जग पुन्हा महासंकटात, ट्रम्प यांच्या हादरवणाऱ्या भाषणातील 10 मुद्दे घ्या जाणून

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात अमेरिकेने इराणविरुद्ध निर्णायक विजय मिळवल्याचा दावा केला. इराणचे नौदल व हवाई दल उद्ध्वस्त झाले असून, इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही आणि मध्यपूर्वेतील मित्रराष्ट्रांचे संरक्षण करू, असे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच हा संघर्ष संपवण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिलं.

विनाश… विनाश… विनाश… जग पुन्हा महासंकटात, ट्रम्प यांच्या हादरवणाऱ्या भाषणातील 10 मुद्दे घ्या जाणून
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
| Updated on: Apr 02, 2026 | 9:00 AM

गेल्या महिन्याभरापासून इराणविरुद्ध पेटलेलं युद्ध, विनाश, उडालेला हाह:कार, याच दरम्यान आज ( भारतीय वेळेनुसार, गुरूवारी सकळी 6.30 वाजता) अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भाषणातून जनतेला संबोधित केलं. मध्यपूर्वेत सुरू असलेले हल्ले आणि संभाव्य युद्धविराम चर्चेच्या भवितव्याबद्दलची अनिश्चितता असतानाचा, त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं हे संबोधन समोर आलं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या संबोधनापूर्वी, अवाजवी आणि अवास्तव मागण्या केल्याचा आरोप तेहरानने वॉशिंग्टनवर केला. एवढंच नव्हे तर दोन्ही बाजूंमध्ये कोणतीही थेट चर्चा होण्याची शक्यतादेखील फेटाळून लावली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भाषणाकडे फक्त अमेरिकेचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. कारण इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर, सुरू झालेल्या युद्धानंतर ट्रम्प यांच राष्ट्राला उद्देशून हे पहिलंच संबोधन होतं.  अमेरिकी सैन्याने (युद्धात) जलद आणि निर्णायक विजय मिळवला असल्याचं त्यांनी यात घोषित केलं. इराणचं नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, त्यांचं हवाई दल खचलंय आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे नेतृत्व पूर्णपणे मोडीत काढलं गेलं असल्याचं ट्रम्प म्हणाले. “आम्ही दोन ते तीन आठवड्यांत इराणवर मोठा हल्ला चढवू” असंही ट्रम्प यांनी म्हटल्याचं दिसून आलं.

ट्रम्प यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

1 – मला नेहमीच राजनैतिक मार्गाचा अवलंब करायचा होता, मात्र इराणने तडजोडीचे सर्व प्रयत्न फेटाळून लावले आणि आपला अणुकार्यक्रम सुरूच ठेवला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. इराणने अणुशक्ती बनू नये, असा आग्रह करत इराणचा अणूकार्यक्रम हा जगासाठी धोका असल्याचं ते म्हणाले.

2 – या संबोधनादरम्यान ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचाही उल्लेख केला. अवघ्या काही मिनिटांतच देशावर ताबा मिळवणाऱ्या अमेरिकी सैन्याच्या जलद कारवाईची त्यांनी प्रशंसा केली. ही मोहीम जलद, प्राणघातक आणि जोरदार असल्याचे वर्णन करत या मोहिमेने जगभरात आदर मिळवला असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

3 – अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या विशाल तेल आणि वायू साठ्यांचा विकास आणि विक्री करण्यासाठी जवळून काम करत आहे, हे साठे जगातील सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक असल्याचं ट्रम्पनी नमूद केलं. अमेरिकेने मध्य-पूर्वेत ऊर्जा स्वयंपूर्णता मिळवली आहे, परंतु आपल्या मित्र राष्ट्रांना पाठिंबा देण्यासाठी तिथे आपले अस्तित्व कायम ठेवल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

4 – अमेरिका इराणमधील आपली सर्व लष्करी उद्दिष्ट्ट साध्य करण्याच्या जवळ पोहोचल्याचे सांगत ही मोहीम शक्य तितक्या लवकर संपवण्याचे आश्वासन ट्रम्पनी दिलं.

5 – आम्ही हे काम लवकरात लवकर, वेगाने पूर्ण करू. इराणला अण्वस्त्रे मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाऊ नये असंही ते पुढे म्हणाले.

6- जोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, तोपर्यंत वॉशिंग्टनकडून आपल्या आखाती मित्र राष्ट्रांचे कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही मार्गाने संरक्षण केलं जाईल, असं ट्रम्पनी सांगितलं. यापूर्वीही ट्रम्प यांनी या युद्धातील अमेरिकेची उद्दिष्ट्ये स्पष्ट केली होती. इराणची आक्रमक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे, त्यांचं क्षेपणास्त्र उत्पादन खिळखिळं करणं, त्यांच्या नौदलाला आणि व्यापक सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करणं, आणि ते कधीही अण्वस्त्रे विकसित करणार नाही याची खात्री करणे यांचा त्यामध्ये समावेश आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी सत्तापालटाचे वचनही दिलं होतं.

7- डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून नाही. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी .ा महत्त्वपूर्ण सागरी मार्गाचे सामरिक महत्त्व कमी लेखलं. “आम्हाला होर्मुझच्या सामुद्रधुनीची गरज भासली नाही आणि आताही नाही” असं ते म्हणाले.

8 – होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेला लष्करी पाठिंबा न देणाऱ्या देशांवर त्यांनी कडाडून टीका केली आणि त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावे, असंही ट्रम्प यांनी सुचवलं.

9- “जेव्हा ( इराण वि. अमेरिका-इस्रायल) संघर्ष संपेल, तेव्हा होर्मुजची सामुद्रधुनी आपोआप खुली होईल” असं ते म्हमाले. इतर देशांनी थोडे धाडस दाखवून होर्मुझचा ताबा घ्यावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलं.

10 – सुमारे २० मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात, ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांचं समर्थन करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा अमेरिकेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा केला. आपल्या कार्यकाळात अमेरिकेची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचली असल्याचंही त्यांनी नमूद केले. इराण आता धोका नाही आणि सर्व सूत्रे आपल्या हातात आहेत, यावरही ट्रम्प यांनी भाषणातून जोर दिला.

Follow Us