Nepal Flash Flood : घर उद्ध्वस्त, माणसंही गेली… पण मालकाच्या परतीच्या आशेने चार श्वान अजूनही तिथेच! 4 Video पाहून मन हेलावेल

पुराच्या भीषण संकटात घर उद्ध्वस्त झाले, मालकही दुर्दैवाने गेले, तरीही चार श्वान गेली चार दिवस त्यांचीच वाट पाहत उद्ध्वस्त घरापाशी ठाण मांडून बसले आहेत. मालक परत येतील, प्रेमाने गोंजारतील या आशेवर ते उपाशीपोटी दिवस काढत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून मुक्या जीवांची अजोड निष्ठा आणि तगमग पाहून मन हेलावून गेल्याशिवाय राहत नाही.

Nepal Flash Flood : घर उद्ध्वस्त, माणसंही गेली... पण मालकाच्या परतीच्या आशेने चार श्वान अजूनही तिथेच! 4 Video पाहून मन हेलावेल
dog
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 5:59 PM

आता थोड्यावेळाने मालक येईल, जवळ घेऊन अंजारेल, गोंजारेल… जीभ काढून त्याचे गाल चाटता येईल… बिस्किट खायला घालेल… फेरफटका मारयाला नेईल… अंगणभर फिरता येईल… या आशेवर गेल्या चार दिवसापासून चार श्वान तिष्ठत बसले आहेत. पुराच्या पाण्याने घराची पडझड झालीय. घरात एकही माणूस नाही. सर्वच गेले. घरासमोरच्या अंगणात चिखलाचा खच पडलाय. माणसंही वावरताना दिसत नाहीये. पण हे कुत्रे पडक्या झडक्या घरात ठाण मांडून बसलेत. थोडीशी चाहूल लागली की अंग झटकून बाहेर येऊन पाहत आहेत. ओळखीचा आवाज आणि चेहरा नाही दिसला तर परत घरात जाऊन अंग टाकत आहेत. दिवसभरात असं कित्येकदा त्यांच्यासोबत होत आहे. त्यांच्याही मनाची धडधड होतेय. मालक दिसत नाहीये म्हणून त्यांचाही चेहरा सुकून गेलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चार व्हिडिओतून मुक्या जीवांची तगमग दिसून येत आहे. हे व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजात थरथरल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडिओ पहिला…

या व्हिडिओत एका मोकळ्या मैदानावर एक कुत्रा येरझाऱ्या मारताना दिसतो आहे. इकडून तिकडे फिरत आहे. या ठिकाणी पूर्वी एक घर होतं. पुरात हे घर वाहून गेलं. याच ठिकाणी हा कुत्रा राहत होता. ती जागा ओळखीची म्हणून तो या ठिकाणी सारखा येरझाऱ्या मारतोय. काही तरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी असलेलं घर कुठे गेलं? असा त्याला प्रश्न पडला असेल. घरातील लोक कुठे गेले? मालक कुठे गेला? अंगणातील झाड कुठे गेलं? असे प्रश्न त्यालाही पडले असतील. एका दिवसात होत्याचं नव्हतं कसं झालं? याचा धक्काही त्याला बसला असेल. या अंगणात काही कपडे, सामान पडलं आहे. त्याचा तो वास घेतोय. आपल्याच धन्याचं हे सामान असल्याची खूण त्याला पटलीय. म्हणून तो सारखा या परिसरात येरझाऱ्या मारताना दिसत आहे. पण आता हे घर आणि घरातील लोक कोणीच उरलं नाही, हे त्याला कोण सांगणार?

Loading...

 

दुसरा व्हिडीओ –

त्रिशूली आणि भोटेकोशी नदीला आलेल्या पुरात सर्वच वाहून गेलं. अनेक गावं उजाडली. एका गावातही सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील एक महलासारखं दिसणारं घर पूर्णत: कोलमडून पडलं आहे. हे घर जमिनीला टेकलं आहे. घराचे वरचे मजले नाहीसे झालेत. जमिनीला टेकलेल्या या घराच्या खाली भुयारासारखा एक मार्ग झाला आहे. त्या मार्गातच एक कुत्रा पडून आहे. मालकाची वाट पाहत तो पडला आहे. लोक त्याला बोलावतात तेव्हा तो बाहेर येतो. मालक आला असावा असं त्याला वाटत असेल म्हणून तो बाहेर येतो आणि परत आत जातो. त्याचा चेहराही पूर्णपणे सुकलेला दिसतोय. खायला काहीच नाही, पण मालकाची अजूनही तो वाट पाहतोय.

 

तिसरा व्हिडीओ –

नेपाळच्या बेट्रावती भागातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतही एक दुमजली घर दिसतंय. घराचा वरचा भाग पूर्णपणे नेस्तनाबूत झाला. खालचा मजला खंडहर सारखा झाला आहे. सर्वत्र माती आणि चिखल आहे. या ठिकाणीही एक कुत्रा चार दिवसापासून मालकाची वाट पाहत बसलाय. मालक आज किंवा उद्या येईल याची त्याला आस लागलीय. तोही जरा काही वाजलं किंवा आवाज आला की लगबगीने बाहेर येतो. मालक तर आला नाही ना याचा कानोसा घेतो. पण मालक नाही आल्याचं लक्षात येताच परत निघून जातो आणि आपल्या जागेवर जाऊन पडून राहतो. गेल्या चार दिवसापासून त्याची ये जा सुरू आहे. काही लोक या कुत्र्याला बोलावण्याचा प्रयत्न करतात. पण तो जात नाही. केवळ मालकासाठी थांबून राहिलाय. आपला मालक या जगात नाही, घरातील एकही माणूस वाचला नाही हे या मुक्या जीवाला कोण सांगणार?

 

चौथा व्हिडिओ-

चौथ्या व्हिडिओत एक नदीचा भाग दिसतोय. या ठिकाणी मोठ्या पाईपमधून पाणी वाहतंय. बाजूलाच डेडबॉडी पडलीय अन् एक कुत्रा या डेडबॉडीला पाहून भूंकत आहे. कदाचित मेलेला व्यक्ती त्याचा मालक असावा. त्यामुळेच या डेडबॉडीकडे पाहून तो भूकंत असेल. वारंवार तो भूकंतोय. त्याच्या आसपास कोणीच नाही. कदाचित आपल्या भूंकण्याने लोक येतील आणि ही डेडबॉडी उचलून नेतील असं त्याला वाटत असावं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us