Earthquake | इंडोनेशियात मोठा भूकंप, 70 पेक्षा जास्त मृत्यू, 400 हून अधिक जखमी, केंद्रबिंदू कोणता?

| Updated on: Nov 21, 2022 | 4:05 PM

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना तात्पुरतं इतरत्र स्थलांतरीत होण्याची व्यवस्था केली आहे.

Earthquake | इंडोनेशियात मोठा भूकंप, 70 पेक्षा जास्त मृत्यू, 400 हून अधिक जखमी, केंद्रबिंदू कोणता?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः  इंडोनेशियात (Indonesia) पुन्हा एकदा भूकंपाचे (Earth quake) तीव्र धक्के जाणवले. यावेळी भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानीदेखील झाली. सोमवारी 5.6 रिश्टर स्केलरचे धक्के येथे जाणवले. या घटनेमुळे जवळपास 70 जणांचा मृ्त्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 400 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

इंडोनेशियातील भूकंप हे महाभयंकर त्सुनामीची आठवण करून देणारे असतात. मात्र सध्या जाणवत असलेले भूकंपाचे धक्के त्सुनामीत रुपांतरीत होणार नाहीत, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे हे भूकंपाचे झटके जाणवले. शुक्रवारीदेखील जकार्ता येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. मात्र सोमवारी 5.6 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने येथील इमारती हलू लागल्या. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले.

इमारती, कार्यालयांमध्ये ठेवलेलं फर्निचर आणि इतर वस्तू हलू लागल्या. एका प्रत्यक्षदर्शीने म्हटलं, आम्ही एवढे घाबरलो की सगळेच जण फक्त इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. प्रत्येकाला लवकरात लवकर इमारतीच्या बाहेर पडायचं होतं.
इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं. पश्चिम जावा येथील चिआनजूर या गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

चिआनजूर येथे अनेक इमारती कोसळल्या. स्थानिक प्रशासनातर्फे तत्काळ बचावकार्य सुरु झाले. मलब्याच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या अनेकांचे प्राण वाचवण्यात आले. तर काहींचा यात मृत्यू झाला.

पुढील काही दिवस नागरिकांनी या भागात इमारती तसेच घरांपासून दूर राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना तात्पुरतं इतरत्र स्थलांतरीत होण्याची व्यवस्था केली आहे.