Israel Mossad : इस्रायलला मानलं, इराणच्या माजी राष्ट्रपतीलाच बनवलं मोसादचं सिक्रेट एजंट, आता उघड झाला थक्क करणारा प्लान

Israel Mossad : मोसादच्या पराक्रमाची यादी खूप मोठी आहे. काही लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलच्या या गुप्तचर यंत्रणेने आतापर्यंत सगळेच अवाक होतील असे कारनामे केले आहेत. आता इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच त्यांचा असाच एक खतरनाक प्लान समोर आलाय. म्हणजे या काय प्लानिंग असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

Israel Mossad : इस्रायलला मानलं, इराणच्या माजी राष्ट्रपतीलाच बनवलं मोसादचं सिक्रेट एजंट, आता उघड झाला थक्क करणारा प्लान
iran former president ahmadinejad
| Updated on: Jul 14, 2026 | 1:45 PM

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने आतापर्यंत अनेक थक्क करणारे कारनामे केले आहेत. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असो, त्याला शोधून संपवणार म्हणजे संपवणार ही मोसादची खासियत आहे. म्हणून इस्रायलच्या शत्रुंच्या मनात मोसादचा प्रचंड धाक असतो. आता इराणमध्ये तख्तापलट घडवून आणण्यासाठी मोसादने असं जाळं विणलेलं ज्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. अमेरिकन वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने आपल्या शोध पत्रकारितेच्या रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा केला आहे. इराणमध्ये तख्तापलट घडवण्यासाठी इस्रायलने कट्टरपंथी आणि आपला सर्वात मोठा शत्रू माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजादलाच मोहरा बनवलेलं. त्यांनाच इराणचा नवा नेता बनवण्याची इस्रायलची योजना होती. हे खूप गुप्त आणि मोठं ऑपरेशन पूर्णपणे फेल झालं.

अमेरिकी आणि इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार इस्रायलने अहमदीनेजाद यांना आपल्या बाजूला आणण्यासाठी अनेक वर्ष मेहनत केली होती. पण काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या युद्धामध्ये ही योजना फेल ठरली. सध्या अहमदीनेजाद इराणच्या ‘इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) गोपनीय विभागाच्या ताब्यात आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. या सगळ्या ऑपरेशनची सुरुवात 2024 च्या सुरुवातीला झालेली. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील ‘लुडोविका यूनिवर्सिटी ऑफ पब्लिक सर्विस’चे प्रोफेसर गेरगेली डेली यांना सरकारकडून एक अजब विनंती आली. सरकारी अधिकाऱ्याने या प्रोफेसरला सांगितलं की, युनिवर्सिटीत जलवायू परिवर्तनासाठी एका कॉन्फरन्स आयोजित करायची आहे. त्यासाठी इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांना बोलवा.

त्यांचा एका प्यादासारखा वापर झाला

ही कॉन्फ्रेंस फक्त एक दिखावा होता. अहमदीनेजाद यांना तिथे आणून इस्रायलच्या गुप्तचर एजंट्ससोबत बैठक हा खरा अजेंडा होता. रेक्टर डेली यांना ठाऊक होतं की, यामुळे यूनिवर्सिटी आणि त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते. पण त्यांना असं वाटलं की, दोन कट्टर शत्रुंना बोलण्याची संधी देऊन कदाचित लोकांचा जीव वाचवण्याचा काम करत आहेत. त्यांचा एका प्यादासारखा वापर झाला, हे स्वत: नंतर रेक्टर यांनी मान्य केलं.

इराणी बॉडीगार्ड्सना चकवा देऊन दोनवेळा गायब

या ऑपरेशनच महत्व तुम्हाला यावरुन लक्षात येईल की, मोसादचे तत्कालीन प्रमुख डेविड बार्निया स्वत: वर्ष 2024 मध्ये अहमदीनेजाद यांना भेटण्यासाठी बुडापेस्टला पोहोचले होते. या भेटीनंतर मोसदाने लगेच अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएला याची माहिती दिली की ते अहमदीनेजाद यांच्या संपर्कात आहेत. इतकच नाही, अहमदीनेजाद यांच्या निवासासाठी आणि परदेश दौऱ्याचा खर्च म्हणून त्यांना गुप्तपणे पैसे पोहोचवण्यात आले होते. जून 2025 मध्ये अहमदीनेजाद पुन्हा बुडापेस्टला आले. तिथे आपल्या इराणी बॉडीगार्ड्सना चकवा देऊन दोनवेळा गायब झाले. इस्रायली एजंट्ससोबत दीर्घ चर्चा केली.

खाकी विंडब्रेकर सोडून महागडे सूट परिधान करु लागले

महमूद अहमदीनेजाद वर्ष 2005 ते 2013 पर्यंत इराणचे राष्ट्रपती होते. आपल्या कार्यकाळात ते इराणला नकाशावरुन मिटवून टाकणार असं अनेकदा बोलले आहेत. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाला गती देणं आणि ‘होलोकॉस्ट’ला खोटं ठरवण्यासाठी ते ओळखले जायचे.राष्ट्रपती पदावरुन गेल्यानंतर त्यांची भूमिका अचानक बदलू लागली. त्यांनी खाकी विंडब्रेकर सोडून महागडे सूट परिधान करणं सुरु केलं. इंग्रजी शिकले. स्वत:ला एका उदारमतवादी नेता म्हणून सादर करु लागले. जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकू लागले.

इराणचा नवीन बॉस बनण्याचं स्वप्न पाहिलं

त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली की, या सिस्टिममध्ये ते पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी परदेशी शक्ती इस्रायल आणि अमेरिकेच्या मदतीने इराणचं बॉस बनण्याचं स्वप्न पाहणं सुरु केलं. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितलं की, ते सत्तेवर आल्यास इस्रायलला मान्यता देतील आणि संबंध सामान्य होतील.

अहमदीनेजाद यांच्या ठिकाणावर इस्रायलने हल्ला का केला?

या सगळ्या योजनेवर फेब्रुवारी 2026 च्या अखेरपर्यंत काम चाललेलं. सर्वकाही सुनियोजितपणे सुरु होतं. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु झालं. अहमदीनेजाद इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या नजरेखाली होते. 28 फेब्रुवारीला इस्रायलने अहमदीनेजाद यांच्या ठिकाणावर एक मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्याचा उद्देश इराणच्या सुरक्षारक्षकांना लढाईत अडकवून ठेवायचं आणि अहमदीनेजाद यांना तिथून काढयचं हा होता.

देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैदेत

इस्रायल-अमेरिकेने 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केला. त्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. सोमवारी त्यांच्या अंत्ययात्रेत अहमदीनेजाद अनेक महिन्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिकरित्या दिसले. प्रचंड उकाडा असूनही वजनदार जॅकेट आणि चेहऱ्यावर मास्क लावून एकटेच गुपचूप उभे होते. त्यांना चारही बाजूंनी सुरक्षारक्षकांनी घेरलेलं. इराणचे अन्य दोन माजी राष्ट्रपती हसन रूहानी आणि मोहम्मद खातमी या दोघांना तर या अंत्ययात्रेत बोलवलही नव्हतं. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या गुप्तचर यंत्रणेने संदर्भ जोडले आणि अहमदीनेजाद यांच्या इस्रायल सोबत असलेल्या संबंधांचा भंडाफोड केला. सध्या ते IRGC च्या गुप्तचर शाखेच्या ताब्यात आहेत. देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैदेत आहेत.

 

Follow Us