US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?

US-Iran War : इराणच्या बंदरांवर नाकेबंदी लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे इराण चांगलाच भडकला असून त्यांनी अमेरिकेला थेट प्रत्युत्तर दिलं आहे. तेहरानच्या सर्वोच्च नेत्याच्या एका सल्लागाराने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजे बुडवण्याची धमकी दिली आहे.

US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?
बंदरांच्या नाकेबंदीमुळे इराण भडकला, मोठा पलटवार
| Updated on: Apr 16, 2026 | 10:07 AM

इराण-अमेरिकेतील युद्धविराम संपायला अवघे काहीच दिवस असून त्यानंतर युद्ध पुन्हा भडकणार का असा सवाल लोकांच्या मनात आहे. कारण गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अरिका- इराण यांच्यात 21 तास चर्चा होऊनही काहीच ठोस निर्णय झाला नाही किंवा काही निष्पन्नही झालं नाही. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार, अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लादण्यात आली. इस्लामाबादमध्ये दोन्ही बाजूंमधील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर, ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व जहाजांना रोखण्याची घोषणा केली आहे. मात्र यामुळे इराण आता चांगलाच बडकला असून , इरामच्या सर्वोच्च नेत्याच्या सल्लागाराने अमेरिकन जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये बुडवण्याची धमकी दिली. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये लवकरच पुन्हा होणाऱ्या शांतता चर्चेवर याचा काही परिणाम होतो का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेला मोठा इशारा ?

जर अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजांवर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला, तर इराण ती जहाजे बुडवेल असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या लष्करी सल्लागाराने बुधवारी दिला.

सरकारी टीव्हीशी बोलताना, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे (IRGC) माजी सरसेनापती मोहसेन रझाई म्हणाले, ” ट्रम्प यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीचे ‘पोलीस अधिकारी’ व्हायचं आहे, पण ते खरोखरच त्यांचं काम आहे का? अमेरिकेसारख्या शक्तिशाली लष्कराचे हे काम आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “तुमची (अमेरिकेची) ही जहाजं आमच्या पहिल्याच मिसाइल्सनी, क्षेपणास्त्रांनी बुडवली जातील. त्यांच्यामुळे अमेरिकेच्या लष्कराला मोठा धोका आहे. आमची क्षेपणास्त्र त्यांना निश्चितच टार्गेट करून त्यांना क्षणात नष्ट करू शकतात ” असा इशाराही त्यांनी दिला.

सीजफायरबद्दल काय म्हणाले रझाई ?

एवढंच नव्हे तर रेझाई यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कराराच्या मुदतवाढीबाबतही एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “मी शस्त्रसंधीच्या मुदतवाढीच्या अजिबात बाजूने नाही आणि हे माझे वैयक्तिक मत आहे.” असं ते म्हणाले. इस्लामाबादमध्ये झालेल्या शांतता चर्चेच्या अपयशानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रेझाई यांचं हे विधान समोर आलं असून ते अत्यंत महत्वपूर्ण आहे.

व्हाईट हाऊस प्रेस सचिवांचं म्हणणं काय ?

दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविटही या विषयावर बोलल्या आहे. “आज सकाळी मी काही चुकीचं वृत्त पाहिलं की आम्ही (अमेरिका) युद्धविरामाच्या मुदतवाढीसाठी औपचारिकपणे विनंती केली होती. पण हे खरे नाही. इराण-संबंधित सागरी निर्बंध हे इराणच्या बंदरांमधून, विशेषतः अरबी आखात आणि ओमानच्या आखातातून जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांना लागू राहतील.” असं त्यांनी नमूद केलं.

इराणच्या बंदरांवर घातलेली नाकेबंदी सुरूच

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट या इराण नाकेबंदीबद्दल बोलल्या. “याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली असून, इराणी बंदरांमध्ये येणाऱ्या किंवा तेथून जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांना ती लागू केली जात आहे. यामध्ये अरबी आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व इराणी बंदरांचा समावेश आहे, आणि या प्रदेशातील आमचे अमेरिकी सैन्य, गैर-इराणी बंदरांकडे ये-जा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या नौकानयन स्वातंत्र्याला पाठिंबा देत आहे.” असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

“अमेरिकेची नौदलाची जहाजे ओमानच्या आखातात गस्त घालत आहेत, तर सेंटकॉम इराणी बंदरांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेने लादलेल्या नाकेबंदीची अंमलबजावणी करत आहे. अमेरिकी सैन्य उपस्थित, सतर्क आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहे,” असं त्यांनी सांगितलं.

Follow Us