तात्काळ ॲाफिस सोडा… थेट आदेशच निघाले, बहरीनच्या ॲमेझॉन ॲाफिसवर महाभयंकर हल्ला, कुणीच…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता तांत्रिक आणि सामरिक पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकी कंपन्यांच्या डेटा सेंटर्स आणि क्लाउड पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा केल्याने, आता परिस्थिती आणखी चिघळली आहे.

तात्काळ ॲाफिस सोडा… थेट आदेशच निघाले, बहरीनच्या ॲमेझॉन ॲाफिसवर महाभयंकर हल्ला, कुणीच…
ॲमेझॉन- ओरॅकल कार्यालयावर हल्ला
| Updated on: Apr 03, 2026 | 8:43 AM

तब्बल 35 दिवसांपासून इराण वि. अमेरिका-इस्रायल हा संघर्ष पेटला असून या युद्धामुळे जगाची झोप उडाली आहे. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यावर त्यांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर युद्धाला तोंड फुटलं आणि सुरू झाला अविरत संघर्ष. संपूर्ण जगाला युद्धाची झळ बसत असली, तरी तिन्ही देशांपैकी एकही जण मागे हटण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. यामुळे प्रचंड नुकसान, वित्तहानी आणि जीवितहानीही होताना दिसत आहे, पण कोणीच पाऊल मागे टाकत नाहीये. दोन्ही बाजू्ंकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. याचदरम्यान इराणने दावा केली की त्यांनी ओरॅकल (Oracle) या अमेरिकेच्या मल्टीनॅशनल टेक कंपनीच्या दुबईतील डेटा सेंटरवर हल्ला केला.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दुबईतील ओरॅकलच्या डेटा सेंटरला लक्ष्य केलं असा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केला. मात्र या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. आयआरजीसीने बहरीनमधील ॲमेझॉनच्या क्लाउड कंप्युटिंग सेंटरला लक्ष्य केल्याचा दावा केल्यानंतर या ताज्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी पूर्वी इशारा दिल्याप्रमाणे ते आखाती प्रदेशातील अमेरिकी कंपन्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे हेच इराणच्या दाव्यांवरून सध्या दिसतंय.

1 एप्रिल रोजी अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिली होती. या यादीत मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोईंगसह 18 कंपन्यांचा समावेश होता. इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई असल्याचं आयआरजीसीने स्पष्ट केलं होतं. मात्र, दुबईच्या माध्यम कार्यालयाने इराणचा हा दावा फेटाळून लावला आहे. आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या तांत्रिक पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं हा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (आयआरजीसी) दावा दुबई प्रशासनाने खोडून काढला.

IRGCने दिला होता हल्ल्याचा इशारा

“इराणमधील प्रत्येक दहशतवादी कृत्यासाठी, १ एप्रिल रोजी तेहरान वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून या कंपन्यांचे युनिट्स नष्ट केले जातील. अमेरिकन माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांना आता आमचे वैध लक्ष्य मानले जाईल.” इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, आयआरजीसीने या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी तात्काळ आपली कार्यस्थळे सोडण्याचा इशाराही दिला आहे, असं इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स म्हटलं होतं. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी, कामाची ठिकाणं तत्काळ सोडा, असा इशाराही आयआरजीसीने दिला होता.

मात्र अमेरिका कोणत्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं चोख प्रत्युत्तर व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिले. , “अमेरिकन सैन्य कोणताही इराणी हल्ला रोखण्यासाठी पूर्णपणे तयार आहे,”असं त्यांनी म्हटलं होतं.
यापूर्वी गुरुवारी, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणमधील कराज येथे बांधकाम सुरू असलेल्या B1 पुलाचे मोठे नुकसान झाले. पश्चिम आशियातील सर्वात उंच पुलांपैकी एक असलेल्या या पुलाचा एक भाग हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला, ज्यात किमान दोन नागरिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, अशी माहिती समोर आली होती.

Follow Us