
इस्रायल आणि अमेरिकेने आज इराणचं कंबरडं मोडलं आहे. या दोन्ही देशाने इराणवर हल्ला केला आहे. या दोन्ही देशांनी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेज़ेश्कियन यांच्या घरावरच हल्ला चढवण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इस्रायलमध्ये तर खबरदारीचा उपाय म्हणून थेट आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या दोन्ही देशांमधील युद्ध महाभयंकर रुप घेण्याची शक्यता असल्याने जगातील इतर देशही हादरले आहेत. या देशांनी इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे. भारतानेही दोन्ही देशातील भारतीय नागरिकांसाठी वॉर्निंग जारी केली आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल्याने तेहरान येथील भारतीय दूतावासाने एक वॉर्निग अर्थात ॲडव्हायजरी जारी केली आहे. इराणमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्क राहा. कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका. शक्यतो आपलं घर सोडू नका, असं आवाहन भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना केलं आहे. तसेच सातत्याने बातम्यांवर लक्ष ठेवा. तसेच पुढची सूचना येण्याची वाट पाहा, असंही दूतावासाने म्हटलं आहे. याशिवाय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी हेल्प नंबर जारी केले आहेत. कोणतीही गरज पडली तर आम्हाला त्वरीत संपर्क साधा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
हल्ल्याची पुष्टी…
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनेही इराणवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेने काही वेळापूर्वीच इराणवर सैन्य ऑपरेशन सुरू केलं आहे. अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करणं आणि इराणी शासनाने निर्माण केलेले धोके नष्ट करणं हा या हल्ल्यामागचा मुख्य हेतू आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच अमेरिका इराणच्या सर्व मिसाईल्स पूर्ण ताकदीने नष्ट करेल. त्यांचा मिसाईल उद्योगच आम्ही नेस्तनाबूत करू, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या विधानावरून इराणविरुद्धचं युद्ध महाभयंकर वळणावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा झाला हल्ला…
रिपोर्ट्स नुसार, इराणवर डझनभर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. मिडल ईस्टमधील अमेरिकन सैन्य ठिकाणांवरून हे हल्ले करण्यात येत आहे. एक एअरक्राफ्ट कॅरिअरद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. इराणमध्ये सातत्याने बॉम्बचा वर्षाव केला जात आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर हा हल्ला सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. इराणच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच मिसाईलचा माराही केला जात आहे. तेहरानमधील राष्ट्रपती भवनाजवळ मिसाईल पडल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सरकारी मीडियावर सायबर हल्लाही केला जात असल्याने इराणची चोहोबाजूने कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे.