Israel-Iran : इराणच्या बॉर्डरजवळ इस्रायलचं स्पेशल ऑपरेशन, वाटलं सगळी फायटर जेट्स एकाचवेळी आता घुसणार पण..
Israel-Iran : सध्या इराण विरुद्ध युद्ध थांबलं असलं तरी इस्रायलने आपला आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. इराणच्या बॉर्डरजवळ इस्रायलने नुकतचं एक स्पेशल ऑपरेशन केलं. त्याची इनसाइड स्टोरी समोर आलीय.

सध्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध थांबलं आहे. पण इस्रायलने आपला आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. इस्रायलने सोमवारी इराणच्या सीमेजवळ मोठा युद्धसराव केला. इस्रायलची अनेक फायटर जेट्स इराणच्या सीमेजवळ पोहोचली होती. तिथून ही सर्व फायटर विमानं माघारी फिरली. इराणला आपली ताकद दाखवून देणं आणि इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने हे ऑपरेशन केलं होतं. Axios च्या रिपोर्ट्नुसार इस्रायलपासून 800 मैल अंतरावर हे ऑपरेशन झालं. इस्रायलमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या आठवडाभर आधी हे ऑपरेशन करण्यात आलं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांची पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एअर बेसवर भेट घेतली होती. अधिकाऱ्यांनुसार या दोन्ही घटनांचा आपसात काही संबंध नाहीय.
अधिकाऱ्यांनुसार, या सैन्य सरावात फायटर जेट्स आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांचा समावेश होता. इराणवर ज्या मार्गाने हल्ला होऊ शकतो, असा रस्ता इस्रायली फायटर जेट्सनी निवडला होता. सीरिया आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून ही विमानं इराणच्या सीमेजवळ पोहोचली. त्यानंतर त्यांनी आपला रस्ता बदलला व पुन्हा माघारी फिरली.
इस्रायलला कारणचं हवं होतं
इस्रायली जेट्स आपल्या दिशेने येत आहेत, हे इराणच्या एअर डिफेन्स प्रणालील कळणार अशा पद्धतीने हे ऑपरेशन करण्यात आलं. इस्रायलने आधीच अमेरिकेला या ऑपरेशनची माहिती दिली होती. या ऑपरेशनला इस्रायलने ट्रेनिंग एक्सरसाइज म्हटलं. इराणला इस्रायलवर हल्ला करण्यापासून रोखणं हा या सरावामागचा उद्देश होता. इराणने या विमानांवर हल्ला करावा, असा सुद्धा इस्रायलचा प्रयत्न असू शकतो असं अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे इस्रायलला इराणविरुद्ध कारवाई सुरु करण्यासाठी कारण मिळालं असतं.
पण नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली
मागच्या आठवड्यातील रिपोर्टनुसार ऑक्टोंबरच्या सुरुवातीला नेतन्याहू आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये इराण विरुद्ध नवीन ऑपरेशन सुरु करण्याबद्दल चर्चा झाली होती. इराण आपला अणवस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याची आमच्याकडे माहिती आहे असं इस्रायलने ट्रम्प यांच्या कानावर टाकलं होतं. युद्ध सुरु झाल्यास इस्रायलमधील निवडणुका टळू शकतात अशी सुद्धा एक शक्यता आहे. कारण इराणकडून प्रत्युत्तराची शक्यता नाकरता येत नाही. ट्रम्प सुरुवातीला पुन्हा कारवाई सुरु करण्याच्या मूडमध्ये दिसले . पण नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व नेतन्याहू यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.