Iran US Ceasefire : युद्ध संपलना, मग भारतीय दूतावासाने नव्या एडवायजरीत असं का म्हटलय की, तुम्ही लगेच..
Iran US Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात दोन आठवड्याच्या सीजफायरची घोषणा झाली आहे. येत्या 10 एप्रिलपासून पाकिस्तानात शांतता चर्चा सुरु होणार आहे. भारतीय दूतावासाने इराणमधील आपल्या नागरिकांसाठी नवीन एडवायजरी जारी केली आहे.

इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये बुधवारी नवीन सुरक्षा एडवायजरी जारी केली आहे. यात इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच दूतावासाने आपातकालीन आणि समन्वयासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 7 एप्रिल 2026 च्या एडवायजरीचा संदर्भ आणि अलीकडच्या घटना पाहता इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दूतावासाचं मार्गदर्शन आणि सुचवलेल्या पर्यायांचं पालन करत लवकरात लवकर इराण सोडण्याचा सल्ला दिला जात आहे असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. त्या शिवाय दूतावासाच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही आंतरराष्ट्रीय सीमेवर जाण्याचा प्रयत्न करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे.
कालही भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एडवायजरी जारी केली होती. त्यात म्हटलेलं की, इराणमधील भारतीय नागरिकांनी पुढचे 48 तास आहेत तिथेच थांबावं. या दरम्यान वीज कार्यालयं, सैन्य संस्था आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून लांब रहा. घराच्या आताच थांबा. महामार्गावरुन फक्त दूतावासाच्या निर्देशानुसार आणि समन्वय साधूनच प्रवास करा असं स्पष्टपणे एडवायजरीत म्हटलं होतं.
ट्रम्प यांनी काय घोषणा केली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली दोन आठवड्यांची डेडलाइन संपण्याच्या एक तास आधी युद्धविराम झाला. अमेरिका पाकिस्तानने दिलेल्या प्रस्तावानुसार इराणसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम करण्यास सहमत आहे अशी घोषणा स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
ट्रम्प यांना पदावरुन हटवण्याची मागणी का?
मंगळवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर ही घोषणा केली. दुसरीकडे डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्याने इराणी सभ्यता संपवण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विनंती केली की, आज रात्री इराण विरुद्ध विनाशकारी कारवाई न करता युद्ध थांबवावं. पण इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची जलवाहतूक पूर्णपणे खुली करावी ही माझी अट आहे” असं ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.