इस्रायल विरोधात आता आणखी एक मुस्लीम देश युद्ध छेडण्याच्या तयारीत
इस्रायलचे अनेक मुस्लीम देशांसोबत संघर्ष सुरु आहेत. इस्रायलहा चारही बाजुंनी शत्रूंनी वेढलेला देश आहे. आतापर्यंत अनेक हल्ले इस्रायलने हाणून पाडले आहेत. सध्या हमास विरुद्ध इस्रायलचा संघर्ष सुरु असतानाच आणखी एका देशाने इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली असून टीका करायला सुरुवाक केलीये.
चार ही बाजुंना आपल्या शत्रू राष्ट्रांशी घेरलेल्या इस्रायल पुढे आता आणखी एक संकट उभं राहणार आहे. युरेशियातील अनेक मुस्लीम देश हे इस्रायलच्या विरोधात आहेत. इस्रायलचे सध्या अनेक देशांसोबत संघर्ष सुरु आहे. त्यात आता आणखी एका देशाची भर पडणार आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इस्रायलविरोधात एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता या दोन देशांमध्ये देखील संघर्ष होण्याची शक्यता आहे. बुधवारी, एर्दोगन म्हणाले की, इस्रायलची दृष्टी आता तुर्कीवर आहे. तुर्की संसदेला संबोधित करताना ते म्हणाले की, इस्रायलला आता रोखले नाही तर त्यांचे पुढील लक्ष्य तुर्की असेल. इस्रायलशी लढून हमास तुर्कस्तानचे रक्षण करत असल्याचा दावा देखील एर्दोगन यांनी केलाय. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यापासून इस्रायलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने हल्ले करत हमासच्या दहशतवाद्यांना शोधून ठार करत आहेत. त्यांच्या ठिकाणांना लक्ष करत आहेत. या संघर्षात अनेक निरपराध लोकांचा देखील जीव गेला आहे.
हमासचे समर्थन
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेकवेळा हमासचे समर्थन केले आहे. त्यांनी गाझामध्ये इस्रायलकडून नरसंहार होत असल्याचा आरोप देखील केला आहे. बुधवारी आपल्या संसदेला संबोधित करताना एर्दोगन म्हणाले, “इस्रायल केवळ गाझामधील पॅलेस्टिनींवर हल्ले करत नाहीये. उलट आपल्यावरही हल्ला होत आहे. हमास गाझामधील अनातोलियाच्या अग्रभागाचे संरक्षण करत आहे.
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्ष हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी अनेकदा भारतविरोधी भूमिका देखील घेतली आहे. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आधीच बिघडले आहेत. तुर्कीने इस्रायलसोबतचा सर्व व्यापार थांबवला आहे. गाझा पट्टीला मानवतावादी मदतीसाठी तात्काळ युद्धविराम देण्याची मागणी त्यांनी केलीये. यासोबतच तुर्कीने इस्रायलला 35,000 पॅलेस्टिनींची हत्या आणि 85,000 लोकांना जखमी केल्याबद्दल दोषी धरले आहे.
आम्हाला मवाळ समजू नका
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन म्हणाले की, “आम्ही आमचे शब्द मवाळ करू अशी अपेक्षा कोणीही करू नये. ते जितके वाईट आहेत तितकेच ते रानटी आहेत. त्यांनी लोकांना सर्वात प्राणघातक शस्त्रे दिली आहेत. भूक आणि तहानने मारले गेले. लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि त्यांना कथित सुरक्षित भागात निर्देशित केले आणि नंतर त्यांनी सुरक्षित भागात नागरिकांची हत्या केली. एप्रिलच्या सुरुवातीला, एर्दोगनने हमासची तुलना तुर्कीच्या क्रांतिकारी सैन्याशी केली ज्याने 1920 च्या दशकात अनातोलियातून परदेशी सैन्याला बाहेर काढण्यास मदत केली होती.
7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा तुर्कीने त्याचा निषेध केला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर देखील त्यांनी टीका करणे टाळले होते. पण जेव्हा इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले सुरु केले त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. इस्रायलमधून त्यांनी आपले राजदूत परत बोलावले. त्यांनतर इस्रायलनेही यावर प्रतिक्रिया म्हणून तुर्कीमधून आपले मुत्सद्दींना परत बोलावले होते.
इस्रायलवर का वाढली टीका
मार्चमध्ये तुर्कीमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तुर्की सरकारने इस्रायलवर टीका करणे वाढवले आहे. त्यांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात अनेक पावले उचलली आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहाराचा खटला दाखल केला आहे. त्यात आता तुर्कीनेही सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने सहा महिन्यांनंतर पुन्हा आपले राजदूत तुर्कीमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे.
2018 नंतर चार वर्षे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण राहिले. 2022 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा रुळावर आले होते, परंतु आता संबंध पुन्हा बिघडले आहेत. जेव्हा इस्रायलने 1948 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले तेव्हा एका वर्षाच्या आत तुर्कीने त्याचे सार्वभौमत्व मान्य केले आणि तुर्की असे करणारा जगातील पहिला मुस्लीम बहुसंख्य देश बनला.