पाकिस्तानच्या डेरा इस्माईल खानमध्ये मोठा स्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

पाकिस्तानमधील डेरा इस्माईल खान येथे भीषण स्फोट झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पोलीस चेकपोस्टला लक्ष्य करण्यात आले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्तानच्या डेरा इस्माईल खानमध्ये मोठा स्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी
| Updated on: Sep 26, 2026 | 8:15 PM

पाकिस्तानमधून एक मोठी बातमी आली आहे. तेथील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान शहरात जोरदार स्फोट झाला आहे. या घटनेत 11 जणांनी जीव गमावला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या स्फोटात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिस चेकपोस्टवर झाल्याची माहिती समोर आली आहे.  या स्फोटाची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)ने घेतली आहे. एपीच्या रिपोर्टनुसार हा आत्मघाती हल्ला होता. स्फोटातील जखमींना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश असल्याचं समजतं.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान सीमेजवळ डेरा इस्माइल खान येथील ‘अमन मेला’ पोलिस चेकपोस्टजवळ हा स्फोट झाला. जखमींमध्ये पोलिस कर्मचारी, कस्टम अधिकाऱ्यांसह काही सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर प्रचंड खळबळ माजली. मात्र लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं. रेस्क्यू टीमने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. घटनेनंतर स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बॉम्ब शोधक व निकामी पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले.

या हल्ल्याची गंभीर दखल घेत खैबर पख्तूनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारचे अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांना सातत्याने लक्ष्य करण्यात आलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us