पाकिस्तानी पोलिसाला अनिल कपूरचा डायलॉग म्हणणं महागात

  • Sachin Patil
  • Published On - 16:33 PM, 29 Nov 2018

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग म्हणणे पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. अनिल कपूरचा डायलॉग म्हटल्याने अधिकाऱ्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आले. पाकिस्तानच्या पाकपतानच्या कल्याणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अरशद यांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पोलीस इन्स्पेक्टर अरशद हे अनिल कपूर यांच्या 2013 मध्ये आलेल्या ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटातील एक डायलॉग म्हणत आहेत.

‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं… इससे ज्यादा मेरी जरुरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नहीं’, असा हा डायलॉग होता.अरशद यांचा हा डायलॉग व्हायरल झाला आणि तो त्यांच्या वरिष्ठांनी बघितला. त्यनंतर पाकपतानच्या जिल्हा पोलीस अधिकारी मारीक महमूद यांनी अरशदला सरळ सस्पेंड केले.एव्हढंच नाही तर यावर चौकशी करण्याचे आदेशही दिले.

भारतीय सिनेमातील डायलॉग म्हटल्याने शिक्षा मिळालेले अरशद हे काही एकटे नाही. काही दिवसांआधी पाकिस्तानच्या एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एएसएफने आपल्या महिला कर्मचाऱ्याला हिंदी गाणं गायल्याने कामावरुन काढून टाकले होते. या महिलेचाही एक व्हिडीओ समोर आला होता, यात ही महिला पाकिस्तानचा झेंडा असलेली टोपी घालून भारतीय गायक गुरु रंधावाचं ‘हाय रेटेड गबरु’ हे गाणं गात होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर करवाई करत नोकरीवरुन काढण्यात आले होते.