Shamonda Virus: जगात नव्या विषाणूची एन्ट्री! शामोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग; WHO काय म्हणतं?

जगभरात नव्या विषाणूच्या संसर्गाची चर्चा सुरू झाली आहे. शमोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग नोंदवण्यात आल्याने या विषाणूबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हायरस नेमका काय आहे, तो किती धोकादायक आहे आणि WHO ने याबाबत काय माहिती दिली आहे, जाणून घेऊयात.

Shamonda Virus: जगात नव्या विषाणूची एन्ट्री! शामोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग; WHO काय म्हणतं?
जगात नव्या विषाणूची एन्ट्री! शामोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग; WHO काय म्हणतं?
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 1:00 PM

फ्रान्समध्ये शामोंडा व्हायरसच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. आतापर्यंत प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूचा माणसामध्ये संसर्ग झाल्याने आरोग्य यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या हे एकच प्रकरण समोर आले असून, संसर्ग नेमका कसा झाला, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे हा विषाणू नेमका काय आहे, तो कसा पसरतो, यापूर्वी तो कुठे आढळला आहे आणि WHO ने याबाबत काय सांगितले, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

काय आहे शामोंडा व्हायरस?

Loading...

शामोंडा हा असा व्हायरस आहे, ज्याचा संसर्ग प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळतो. गाय, मेंढी, शेळी आणि घोडे यांसारख्या प्राण्यांमध्ये यापूर्वी या विषाणूची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मात्र, फ्रान्समध्ये माणसालाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणांकडून त्याच्या प्रसारावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मिजेसच्या चाव्यामुळे पसरतो विषाणू

शमोंडा व्हायरसचा प्रसार प्रामुख्याने मिजेस नावाच्या अतिशय लहान चावणाऱ्या माश्यांमुळे होतो. संक्रमित जनावराला चावल्यानंतर या माश्या इतर जनावरांमध्येही विषाणूचा प्रसार करू शकतात. हा विषाणू सहसा एका जनावराकडून दुसऱ्या जनावरात थेट पसरत नाही. मात्र, गर्भवती जनावराला संसर्ग झाल्यास त्याच्या पोटातील पिल्लापर्यंतही विषाणू पोहोचण्याची शक्यता असते. माणसाला या विषाणूचा संसर्ग नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित व्यक्तीला मिजेसच्या चाव्यामुळे संसर्ग झाला होता की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास केला जात आहे.

आफ्रिका आणि जपानमध्ये आधीपासून अस्तित्वात

शमोंडा व्हायरस नवीन नसून, यापूर्वी आफ्रिका आणि जपानमधील जनावरांमध्ये आढळला आहे. पश्चिम युरोपमधील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि फ्रान्स या देशांमध्येही गायी आणि घोड्यांमध्ये या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मात्र, फ्रान्समध्ये माणसाला या विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्याने या विषाणू संदर्भातील संशोधन आणि निरीक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

WHO परिस्थितीवर लक्ष ठेवून

शामोंडा व्हायरसच्या मानवी संसर्गाची नोंद झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संबंधित आरोग्य यंत्रणा या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. फ्रान्समध्ये सध्या शामोंडा व्हायरसच्या मानवी संसर्गाचे एकच प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे हा विषाणू माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. WHO फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संसर्ग नेमका कुठून झाला, तो कसा पसरला आणि माणसांसाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचा तपास सुरू आहे. या तपासातून नवी माहिती समोर आल्यानंतर WHO कडून पुढील अपडेट दिले जातील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us