संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहरचा खात्मा ? सोशल मीडियावर बॉम्बस्फोटात ठार झाल्याचा दावा

Masood Azhar Dead | मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा मागील महिन्यात सुरु होती. आता संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर याचाही पाकिस्तानात खात्मा झाल्याची बातमी आली आहे. सोशल मीडियावरील या बातमीला दुजोरा मिळाला नाही.

संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहरचा खात्मा ? सोशल मीडियावर बॉम्बस्फोटात ठार झाल्याचा दावा
| Updated on: Jan 02, 2024 | 8:56 AM

कराची, दि. 2 जानेवारी 2024 | काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम ठार झाल्याची बातमी आली होती. मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात होता. मागील महिन्यातील या बातमीनंतर सोमवारपासून संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर ठार झाल्याच्या बातम्या एक्सवर (ट्विटर) सुरु आहे. त्याच्या ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि भारतीय संसदेवर हल्ला रचण्याच्या कटातील आरोपी मसूद सोमवारी सकाळी 5 वाजता मारला गेला. पाकिस्तानमधील बहावलपूर येथे एका बॉम्बस्फोटात तो मारला गेल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

कंदहारचे अपहरणकर्ता ते संसद हल्ला

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा नेता मसूद अझहरचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियातील वृत्तानुसार मोस्ट वाँटेड दहशतवादी, कंदहार विमानचा अपहरणकर्ता, जैश-ए-मोहम्मद संघटनेचा नेता आणि संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर हा बहावलपूर मशिदीतून परतत होता. त्यावेळी अज्ञात लोकांनी सकाळी 5 वाजता केलेल्या बॉम्बस्फोटात तो ठार झाला आहे.

भारतीय संसदेवर हल्लाचा कट

अझहर याचा जन्म 10 जुलै 1968 रोजी पाकिस्तानात झाला. तो पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथील रहिवाशी आहे. अतिरेक्यांनी कंदहार विमानाचे अपहरण करुन मसूद अझहरसह काही दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्याने 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कटही रचला होता. संसद हल्लाप्रमाणे 2005 मधील अयोध्या रामजन्मभूमी हल्ला आणि फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात तो सहभागी होता. याशिवाय भारताविरोधातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सामील होता. 2016 मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. 2016 मध्ये उरी हल्ला आणि अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथे भारतीय कॉन्स्टेबलवर अटॅकला तो जबाबदार आहे. तो अल-कायदा चीफ ओसामा बिन लादेन आणि तालिबान फाउंडर मुल्लाह उमर याचा खास होता.