आम्ही जिवंत आहोत… 9 दिवसानंतर नेपाळमध्ये चमत्कार, बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आवाज ऐकून बचाव कार्याला वेग
Upper Trishuli 3A Hydropower Project: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूराने हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. तर अद्याप शेकडो जण बेपत्ता आहेत. दरम्यान त्रिशुला नदीवरील जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा 9 दिवसानंतर पहिल्यांदा आवाज ऐकू आल्याने बचाव कार्याला वेग आला आहे.

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी विनाशकारी महापूर आला. अचानक आलेल्या या महापूराने उत्तर नेपाळमधील पाच जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक संकटात हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला. तर अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवल्या जात आहे. नैसर्गिक आपत्तीतही काही चमत्कार, काही दिलासे मिळत आहेत. अनेक जण ढिगाऱ्या खाली दबलेले असतानाही जिवंत बाहेर आले आहेत. दरम्यान नेपाळच्या त्रिशुला जलविदयुत प्रकल्पातील बोगद्यातून कामगारांचा 9 दिवसानंतर आवाज ऐकू आला. गेल्या आठवड्यातही या प्रकल्पाच्या बोगद्यात बचाव पथक गेले होते. पण कोणीच नसल्याचा अंदाज वर्तवत मोहिम थंडावली होती. पण आता या बोगद्यातून कामगाराचा आवाज ऐकू आल्यानंतर बचाव आणि शोध मोहिमेला वेग आला आहे.
आम्ही जिवंत आहोत
रसुवा जिल्ह्यातील अप्पर त्रिशुला 3 ए हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यात (Upper Trishuli 3A Hydropower Project Tunnel) काही कामगार अडकले होते. यापूर्वी सुद्धा या परिसरात शोध मोहिम राबवली गेली होती. दरम्यान काल बचाव पथकाला कामगारांचे आवाज ऐकू आले. एकापेक्षा अधिक व्यक्ती बोगद्यात असल्याची खात्री झाली. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याला आता वेग आला आहे.
BREAKING: Nine days after the devastating Bhote Koshi flash flood, rescuers at the Upper Trishuli 3A Hydropower Project have confirmed hearing voices of more than one person trapped inside the tunnel. Rescue efforts remain underway.
— Everest Today (@EverestToday) September 4, 2026
नेपाळचे लष्कर आणि बचाव पथकाने बोगद्याच्या आता दुरपर्यंत शोध मोहिम राबवली. त्यांनी आवाज दिले. तेव्हा त्यांना प्रतिसाद मिळाला. आम्ही बोगद्यात सुरक्षित असल्याचे कामगारांनी सांगितले. बचाव पथकातील सहभागी अभियंता तसेच खासदार श्रीराम न्यौपाने यांनी सोशल मीडियावर याविषयी एक पोस्ट केल्याचे नेपाळमधील माध्यमांनी दावा केला आहे. त्यानुसार त्यांना बोगद्यातून कामगारांचे आवाज ऐकू आले. त्यांनी आत जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर बचाव पथकाने अजिबात घाबरू नका, आम्ही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आल्याची माहिती त्यांना दिली. त्यालाही कामगारांनी प्रतिसाद दिला. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्तर नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पात नेपाळचे आणि भारतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करत होते. त्यातील अनेकांचा ठावठिकाणा लागत नसल्याने दुसर्यांदा शोध मोहिम हाती घेण्यात आली.
एक व्यक्तीची सुटका
या भीषण नैसर्गित आपत्तीच्या 9 दिवसानंतर अप्पर त्रिशुला 3 ए हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली. ही व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर बचाव पथकाने आनंद साजरा केला. या बोगद्यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली असली तरी अद्याप बोगद्यात अजूनही काही कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. ते बचाव पथकाच्या आवाजांना प्रतिसाद देत आहेत.
BREAKING: Nine days after the devastating Bhote Koshi flash flood, one person has been rescued alive from inside the tunnel at the Upper Trishuli 3A Hydropower Project. Rescuers had earlier confirmed hearing voices of more than one person trapped inside. Rescue efforts remain… pic.twitter.com/ZYL0xBf7sN
— Everest Today (@EverestToday) September 4, 2026
बचाव कार्यात मोठे अडथळे
पूरामुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल, पाणी आणि मातीचे ढिगारे साचले आहे. यामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बचावकार्य अत्यंत धोकादायक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक झाले आहे. बोगद्यात काही ठिकाणी मोठे दगड आणि मातीचे ढिगारे हटवण्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहे. त्यासाठी नियंत्रित स्फोटकांचीही वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.