ना लोकल, ना बस, या ठिकाणी लोक ऑफिस संपल्यानंतर थेट नदीत उडी मारून जातात घरी, कारण ऐकून…
भारतात ऑफस संपल्यानंतर अनेक लोक बस, कार, मेट्रो किंवा लोकचा मार्ग निवडतात. पण असं एक ठिकाणं आहे जेथे लोक ऑफिस सुटलं की थेट नंदीत उडी मारून घरी पोहोचतात. नेमकं कारण काय?

भारतात ऑफिसची वेळ संपल्यानंतर रस्त्यांवर आणि मेट्रो-लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचं असतं. मात्र याच समस्येवर स्वित्झर्लंडमधील लोकांनी एक अनोखा आणि भन्नाट उपाय शोधला आहे. सध्या सोशल मीडियावर याचाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक ऑफिस संपल्यानंतर बस, ट्रेन किंवा ट्रॅफिकमध्ये अडकण्याऐवजी थेट नदीत उडी मारताना दिसत आहेत. हे लोक पोहतच आपल्या घराच्या दिशेने जातात. स्वित्झर्लंडमधील काही शहरांमध्ये हा प्रकार सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे. ऑफिसमधून बाहेर पडताच हे लोक नदीकिनारी पोहोचतात आणि कोणताही वेळ न दवडता पाण्यात उतरतात. नदीच त्यांच्यासाठी ‘शॉर्टकट रूट’ बनली आहे.
कपडे आणि सामानासाठी खास तयारी
या संपूर्ण प्रकारातील सर्वात खास गोष्ट म्हणजे लोक आपले कपडे आणि महत्त्वाचं सामान सुरक्षित ठेवण्यासाठी खास वॉटरप्रूफ बॅग किंवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. लोक आपले कपडे त्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ती सोबत बांधतात किंवा हातात धरून पोहत पुढे जातात. त्यामुळे सामान ओलं होत नाही आणि ते आरामात घरी पोहोचू शकतात.
हा प्रकार केवळ वेगळाच नाही तर अनेकांच्या मते फायदेशीरही आहे. यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून सुटका होते आणि बस, ट्रेन किंवा टॅक्सीचे पैसेही वाचतात. याशिवाय पोहण्यामुळे शरीराचा व्यायामही होतो. त्यामुळे हा प्रवास फिटनेससाठीही उपयोगी ठरत असल्याचं अनेकांचं मत आहे.
मात्र धोका देखील तितकाच
हा प्रकार ऐकायला आणि पाहायला रोमांचक वाटत असला तरी तो काही प्रमाणात धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा उपाय वापरणं शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील काही शहरांमध्ये नद्या स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. पाण्याचा प्रवाह नियंत्रित असतो आणि बहुतांश लोकांना पोहता येत असल्याने ते हा पर्याय सहज स्वीकारतात. काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शक सूचनाही दिल्या जातात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी या कल्पनेचं कौतुक करत तिला “स्मार्ट आणि मजेशीर” म्हटलं आहे, तर काहींनी यामध्ये मोठा धोका असल्याचं सांगत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.