CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, तीन जवानांचा मृत्यू

CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, तीन जवानांचा मृत्यू

श्रीनगर: दहशतवाद्यांकडून गोळीबार होत असताना, आता आपल्याच जवानांकडून सहकाऱ्यांवर गोळीबार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये CRPF जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. उधमपूर इथल्या बट्टल बलियान इथं सीआरपीएफ कॅम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे.

आरोपी जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलमधून हा गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. त्यामुळे या जवानाचीही प्रकृती गंभीर आहे.

या गोळीबारात राजस्थानातील झुंझूनू इथले हेड कॉन्स्टेबल पोकरमाल आर, दिल्लीतील योगेंद्र शर्मा आणि हरियाणाच्या रेवाडी इथल्या उमेद सिंह यांचा मृत्यू झाला. हा गोळीबार मूळचा कानपूरचा असलेला अजितकुमार या जवानाने केला. त्याच्यावर सैन्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला करुन आरोपी जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. या जवानांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. या वादाचं पर्यवसन गोळीबारात झालं.

हे सर्व जवान CRPF 187 बटालियनचे आहेत. या गोळीबारानंतर उधमपूरचे एसएसपी राजीव पांडे यांच्यासह सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Published On - 9:52 am, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI