वाळूतस्करी प्रकरणी सहा आरोपींना श्रमदानाची शिक्षा

वाळूतस्करी प्रकरणी सहा आरोपींना श्रमदानाची शिक्षा

बीड : जिल्हा सत्र न्यायालयाने वाळू तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा न देता, श्रमदानाची शिक्षा सुनावली आहे. अवैध वाळू उत्खनन आणि एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी या सहा जणांवर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु होता. यावर निर्णय देत न्यायालयाने या सहा जणांना वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन काम संपेपर्यंत श्रमदान करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे.

गेल्या 4 ऑगस्ट 2017 मध्ये हे सहा जण अवैध वाळू उत्खनन करत होते. ही बाब गेवराईचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणांचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केली होती. कारवाईचा राग मनात धरुन यांनी तांबारे यांना जबर मारहाण केली होती. त्यानंतर तांबारे यांनी गेवराई पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी यावप्रकरणाचा  निकाल लागला. जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व बाबी तपासून या सहा आरोपींना दोन महिने श्रमदान करण्याची शिक्षा सुनावली आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. यातच न्यायालयाने या आरोपींना वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन काम संपेपर्यंत श्रमदान करण्याची अनोखी शिक्षा सुनावली. त्यामुळे न्यायालयाच्या या अभूतपूर्व निर्णर्याचं सर्वत्र स्वागत होत आहे.

हे सहा आरोपी शिक्षित आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करुन न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. शिक्षा मिळालयानंतर हे सहाही आरोपी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. पेंडगाव येथे त्यांचे श्रमदान सुरु आहे. या आरोपींनीही न्यायालयाच्या या निर्णयायाचं स्वागत केले आहे. एवढंच नाही, कुणीही  गुन्ह्याच्या वाटेवर जाऊ नये, असं आवाहन ते करत आहेत.

Published On - 8:05 pm, Sun, 12 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI