पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, अण्णा हजारेंची साक्ष घेण्याचे आदेश

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, अण्णा हजारेंची साक्ष घेण्याचे आदेश

उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलाविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज दिला होता. मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये, असा अर्ज देत त्याला विरोध केला आणि तो अर्ज सेशन कोर्टाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या हत्याकांडाची नियमित सुनावणी 14 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे. अण्णा हजारे वगळता पवनराजे हत्याकांडात जवळपास इतर सर्व साक्षीदार यांचे जबाब झाले आहेत.

3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समाज काझी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली होती. तब्बल 3 वर्षानंतर 6 जून 2009 रोजी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने मुंबई येथून अटक केली होती. डॉ. पाटील यांना अटक केल्यानंतर सीबीआयने 9 जून 2009 रोजी अण्णा हजारे यांचा तपासकामी लेखी जबाब घेतला. या जबाबात अण्णा हजारे यांनी तेरणा ट्रस्टसह तेरणा कारखाना साखर घोटाळा, कारगिल निधीसह सावंत आयोगातील बाबी उघड केल्याचं सांगितलं.

अण्णा हजारे यांचा सीबीआयने पवनराजे हत्याकांडात लेखी जबाब घेतला असला तरी त्यांची कोर्टासमोर तोंडी साक्ष घेण्यासाठी सीबीआयने अर्ज केला होता. त्यावर डॉ. पाटील यांच्या वकिलांनी आक्षेप घेत विरोध केला. हा विरोध सत्र न्यायालयाने मान्य केला. त्यावर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. मात्र ते फेटाळण्यात आलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत अण्णा हजारे यांची सरकारी बाजूचे साक्षीदार म्हणून कोर्टासमोर साक्ष देण्याचे आदेश दिले. आनंदीदेवी राजे निंबाळकर यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात वकील म्हणून सुधांशू चौधरी यांनी काम पाहिले.

पवनराजे हत्याकांडाचा खुलासा करणारा पारसमल जैन पवनराजे यांच्या हत्येबरोबरच समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे याच्यामार्फत दिली होती. मात्र आपण ती नाकारली, असं कोर्टातील 164 च्या जबाबात कबूल केलं होतं. कोर्टातील या खळबळजनक खुलाशानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्याचा कट आणि सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला. गेली 10 वर्ष झाले तरी अद्याप या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

पवनराजे दुहेरी हत्याकांडात पद्मसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे हे संशयित आरोपी असून डॉ. पाटील हे 25 सप्टेंबर 2009 पासून जामिनावर आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI