प्रेमात पाडणारा गुलाब, पैसा देणारी मावळची गुलाबशेती!

प्रेमात पाडणारा गुलाब, पैसा देणारी मावळची गुलाबशेती!

पुणे: प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फुलं. त्यातही लाल रंगाचे गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतिकच. पुण्याजवळच्या मावळमध्ये सध्या गुलाब शेती फुलली आहे. मावळ हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत सुपीक प्रांत. कधीकाळी स्वराज्य उभारणीसाठी रांगडे मावळे देणारी मावळची ही माती, आज प्रेमाच्या प्रतिकाला जन्म देत आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत इथल्या शेतकऱ्यांनी गुलाब निर्मितीचा प्रयोग केला. अवघ्या काही वर्षातच इथल्या दर्जेदार गुलाब पुष्पांच्या प्रेमात सातासमुद्रापलीकडील लोक पडले. म्हणूनच जगातील आठ देशांमध्ये आज मावळमधील गुलाब निर्यात केला जात आहे. मात्र मावळ ते विदेशापर्यंतचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.

सिद्धार्थ भेगडे आणि पोपट जांभळे यांनी फुलशेतीचा निवडलेला पर्याय आणि त्यातून होणारा नफा इतर शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागला. मग त्यांनीही या फूलशेतीची कास धरली. आज तळेगाव दाभाडेत अशा विविध रंगी गुलाब पुष्पांचं उत्पादन घेणारी सुमारे 70 पेक्षा अधिक पॉलीहाऊस आहेत. त्याहूनही विशेष म्हणजे सर्व फूलउत्पादक गटशेती करुन, कोणत्याही एजंटविना फुलांची विक्री करतात.

ही गुलाब शेती कशी केली जाते आणि या गुलाब शेतीतून शेतकऱ्यांना नफा कसा मिळतो?

5 गुंठे जागेतही पॉलीहाऊस उभारता येतं

या सर्व फुलांना डच जातीचे गुलाब म्हणून ओळखलं जातं

सर्व नर्सरीमध्ये या फुलांची कलमं उपलब्ध आहेत

एक फूल निर्मितीसाठी 3 ते साडे तीन रूपये खर्च येतो

फुलांच्या गुणवत्तेनुसार एक फूल 10 ते 14 रुपयापर्यंत विकले जाते

व्हॅलेंटाईन डे, धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, अनेक समारंभाच्या सजावटीसाठी फुलांची मागणी

दरवर्षी निर्यात केली जाऊ शकतील अशी एकरी 40 हजार फुलांची निर्मिती

एकट्या मावळ प्रांतात तब्बल 220 एकरवर फूलशेती

देशातून निर्यात होणाऱ्या डच गुलाबाच्या निर्मितीत मावळ फूलउत्पादकांचा 35% वाटा

दरवर्षी होणारी उलाढाल सुमारे 60 कोटी

पुणे जिल्ह्यातील मावळचे नाव आज जगाच्या नकाशावर झळकतंय, त्यात या फूलशेतीचाही वाटा आहे. मात्र त्याचं सर्व श्रेय इथल्या फूलउत्पादक पुरुष शेतकऱ्यांनाच जातंय असं नाही, तर या व्यवसायात महिलांचाही मोठा वाटा आहे. सुनंदा अडकरही त्यापैकीच एक. स्वत: च्या बाळाप्रमाणे सांभाळ करत वाढविलेल्या फुलांना दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी करताना, आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो असं त्या म्हणतात. अर्थातच सुरक्षित पॉलीहाऊसमध्ये केली जाणारी ही फूलशेती, महिला शेतकऱ्यांनीही कशी करावी याचा कानमंत्र त्यांनी दिला. तर पवनानगरचे तरुण सरपंच स्वतः फूलउत्पादकही आहेत. त्यांनीही तरुणांना अशा शेती पूरक व्यावसायाकडे वळण्याचं आवाहन केलं आहे.

त्यामुळे नगदी नफा मिळवून देणाऱ्या, प्रेम, शांती, सद्भावना आणि आनंदाचं प्रतिक असलेल्या या फुलांचे उत्पादन शेतकऱ्यांना निश्चितच उभारी देणारं ठरेल.


Published On - 11:23 am, Sat, 9 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI