श्रीरंग बारणेंना उरण, पनवेलमधून विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ : प्रशांत ठाकूर

पुणे : मावळ लोकसभेसाठी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे शेकापवर राष्ट्रवादीची मदार आहे. पण उरण आणि पनवेल मतदारसंघातून श्रीरंग बारणेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देऊ, असं भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी […]

श्रीरंग बारणेंना उरण, पनवेलमधून विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ : प्रशांत ठाकूर
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

पुणे : मावळ लोकसभेसाठी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे शेकापवर राष्ट्रवादीची मदार आहे. पण उरण आणि पनवेल मतदारसंघातून श्रीरंग बारणेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देऊ, असं भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलंय.

मावळ लोकसभा मतदारसंघाची चर्चा होते त्यावेळी फक्त पिंपरी-चिंचवड आणि मावळ या तीन मतदार संघाची चर्चा होते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये अजूनही तीन तालुके आहेत, ज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचं प्राबल्य आहे. पनवेल आणि उरण या मतदारसंघांमधून युतीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देऊ, असं प्रशांत ठाकूर म्हणाले.

या संपूर्ण मतदारसंघांमध्ये मोदी फॅक्टर चालेल आणि लोक मोदींना बघून मतदान करतील, असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीचा भाजपने सुपडासाफ केला होता. प्रशांत ठाकूर यांच्याकडे महापालिका जिंकण्याची जबाबदारी होती. याशिवाय संपूर्ण रायगड जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ज्या शेकापवर राष्ट्रवादीची मदार आहे, त्या शेकापवरच मात करण्याची तयारी भाजपने केल्याचं चित्र आहे.

उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांचं शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे वडील अजित पवार आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पार्थ पवार यांनी लोकांच्या भरोशावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत निवडणुकीत विजय मिळणार असा विश्वास व्यक्त केला.

श्रीरंग बारणे यांनी फॉर्म भरण्यापूर्वी भव्य रॅली काढत माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, आमदार लक्ष्मण जगताप, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,  बापू सूत्रे, बाळा भेगडे यांच्यासोबत येऊन अर्ज भरला. त्यामुळे त्यांची ताकद वाढली. फॉर्म भरल्यानंतर प्रतिक्रीया देत असताना मला कुठलाही वारसा नसल्यामुळे सर्वसामान्यांची निवडणूक लढत आहे. त्यामुळे विजय माझाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार कुटुंबासाठी मावळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पार्थ पवार त्यांच्या प्रचाराच्या स्टाईलमुळे सतत चर्चेत आहेत, त्यांना ट्रोलही केलं जातं, तर शिवसेना आणि भाजपने जोरदार प्रचार सुरु केलाय. श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाई झाल्याने ताकद आणखी वाढली आहे. शिवाय उरण, कर्जत आणि पनवेल या मतदारसंघांमधून मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें