चहाप्रेमींनो सावधान! रोज चहा पिताना करू नका ‘या’ चुका, आरोग्यावर होतो वाईट परिणाम
अनेकांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने होते. पण तुम्हाला माहित आहे का नकळत घडणाऱ्या काही चुका तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. जाणून घ्या चहा पिताना कोणत्या चुका टाळाव्या.

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी, कामातील कंटाळा दूर करण्यासाठी किंवा मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारताना अनेकांना गरमा गरम चहाचा कप हातात पाहिजेच असतो. काही जणांना सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच झाल्यासारखी वाटत नाही. मात्र, रोज चहा पिण्याची सवय असली तरी तो कधी आणि कसा प्यावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चहा पिताना नकळत केल्या जाणाऱ्या काही चुका आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. यासाठी चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही तर आपल्या रोजच्या सवयींकडे लक्ष देऊन काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. फिटनेस कोच डॉ ज्योति श्रीवास्तव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊया चहा पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
अतिशय गरम चहा पिणे टाळा
अनेकांना चहा अगदी गरमा गरम पिण्याची सवय असते. मात्र, सतत अतिशय गरम पेये पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संशोधन संस्थेनुसार, ६५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचे ड्रिंक्स नियमितपणे पिणे अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या वाढलेल्या धोक्याशी संबंधित आहे. त्यामुळे चहा बनवल्यानंतर लगेच पिण्याऐवजी तो थोडा थंड होऊ द्यावा. चहा आरामात पिता येईल इतका कोमट झाल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका
सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काही व्यक्तींना अॅसिडिटी होऊ शकते. तसेच चहामध्ये असलेले टॅनिन अन्नातील लोहाचे शोषण कमी करू शकतात. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे. विशेषतः शरीरात लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चहा आणि जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवल्यास लोहाच्या शोषणावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.
चहा गाळण्यासाठी प्लास्टिकच्या गाळणीचा वापर टाळा
चहा गाळताना प्लास्टिकच्या गाळणीऐवजी स्टेनलेस स्टीलच्या गाळणीचा वापर करावा. अतिशय गरम चहाच्या संपर्कात प्लास्टिक आल्यास त्यातून सूक्ष्म प्लास्टिक कण सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चहा गाळण्यासाठी सुरक्षित आणि उष्णतारोधक साहित्याची निवड करणे योग्य ठरते. याशिवाय दिवसातून अनेक कप चहा पिणे, चहामध्ये जास्त साखर घालणे आणि चहासोबत बिस्किटे किंवा तळलेले पदार्थ खाणेही टाळावे. चहाचे सेवन मर्यादित ठेवून संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.