डार्क चॉकलेट इतर चॉकलेट्सपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्यामागील हे खास कारण
डार्क चॉकलेट इतर चॉकलेट्सपेक्षा अधिक आरोग्यदायी मानले जाते. ते खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला तर मग डार्क चॉकलेटचे सेवन आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊयात.

चॉकलेट्स खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यात ज्या लोकांना खूप गोड खायला आवडतं त्यांना तर चॉकलेट खाण्यापासून थांबवणे कठिण आहे. त्याच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवरचे चॉकलेट पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की फ्लेवर चॉकलेटपेक्षा किंवा इतर चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट अधिक आरोग्यदायी मानले जाते. कारण त्यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, फायबर आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक फायदे देऊ शकतात.
डार्क चॉकलेटमधील पोषक तत्वे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यास मदत करतात, परंतु त्यांचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा त्याची योग्य निवड केली जाते आणि संतुलित प्रमाणात सेवन केले जाते. शिवाय काही व्यक्तींना त्याचे सेवन करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज भासू शकते. चला तर मग डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे, ते खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणत्या व्यक्तींनी त्याचे सेवन करताना सावधगिरी बाळगावी, याबद्दल जाणून घेऊयात.
डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत?
हेल्थलाइननुसार, डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला पेशींचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. त्यातील लोह शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते, तर मॅग्नेशियम स्नायू, नसा आणि शरीरातील इतर अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी आवश्यक असते. तांबे आणि मॅंगनीज देखील चांगले आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
डार्क चॉकलेटमध्ये फायबर देखील असते, जे पचनासाठी फायदेशीर ठरू शकते. काही संशोधनानुसार त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य जपण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास आणि रक्तदाब निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जास्त कोको असलेले डार्क चॉकलेट इतर चॉकलेट्सपेक्षा एक चांगला पर्याय मानले जाते.
डार्क चॉकलेट खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
डार्क चॉकलेट खरेदी करताना सर्वात महत्वाचं म्हणजे लेबल काळजीपूर्वक वाचा. किमान 70% कोको असलेले डार्क चॉकलेट निवडा. शक्यतो कमी साखर असलेले चॉकलेट निवडा.
ज्या चॉकलेटमध्ये साखरेचे किंवा इतर गोड पदार्थांचे प्रमाण जास्त असते त्याचे सेवन शरीरासाठी आरोग्यदायी फायदे कमी मिळतात. तसेच चांगल्या दर्जाचे डार्क चॉकलेट निवडा आणि त्याचे अतिसेवन टाळा. संतुलित आहाराचा भाग म्हणून डार्क चॉकलेटचा समावेश करणे सर्वोत्तम आहे.
डार्क चॉकलेट खाताना या लोकांनी सावधगिरी बाळगावी
मधुमेह असलेल्या, कॅफीनची संवेदनशीलता असलेल्या आणि मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डार्क चॉकलेटचे सेवन करताना सावधगिरी बाळगावी. चॉकलेटमधील कोणत्याही घटकाची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी डार्क चॉकलेटचे सेवन करू नये.
याव्यतिरिक्त जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला एखाद्या विशिष्ट आरोग्य समस्येमुळे चॉकलेट न खाण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर तुम्हाला काही अस्वस्थता जाणवल्यास ते खाणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
——————————————————————————————————–