Yoga : ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करता? शरीराचा आखडलेपणा दूर करण्यासाठी करा ही तीन योगासनं
Yoga : ऑफिसमध्ये तासन्तास खुर्चीवर बसून काम केल्याने पाठदुखी, चुकीची बॉडी पोश्चर आणि शरीरातील लवचिकता कमी होण्याची समस्या होते. अशावेळी रोजच्या रूटीनमध्ये काही सोपी योगासने समाविष्ट केल्याने शरीराला स्ट्रेचिंग मिळण्यास मदत होऊ शकते.

बदललेल्या जीवनशैलीत ऑफिस कामाचे स्वरूप देखील बदललेले आहे. अनेक जण दिवसातील ८ ते ९ तास किंवा त्याहून अधिक वेळ खुर्चीवर बसून काम करतात. सतत एकाच स्थितीत बसल्यामुळे पाठीवर आणि कंबरेवर ताण येऊ शकतो. त्यासोबतच खांदे आखडणे, शरीराची हालचाल कमी होणे आणि पोश्चर बिघडणे अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे कामाच्या वेळेत नियमित ब्रेक घेण्यासोबतच शरीराला स्ट्रेचिंग देणे महत्त्वाचे आहे.
काही योगासने पाठीच्या स्नायूंना स्ट्रेच आणि मजबूत करण्यास तसेच पोश्चर सुधारण्यास मदत करू शकतात. सतत बसून काम करणाऱ्यांसाठी ही ३ योगासने बेस्ट आहेत.
भुजंगासन
दिवसभर खुर्चीवर बसून काम करताना शरीराची पोझिशन पुढे झुकलेली राहू शकते. त्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी भुजंगासनाचा सराव उपयोगी ठरू शकतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि दोन्ही हातांचे तळवे खांद्यांच्या खाली जमिनीवर ठेवा. पाय मागच्या बाजूला सरळ ठेवल्यानंतर श्वास घेत हळूहळू डोके आणि छाती वर उचला. या वेळी खांदे सैल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शरीराला क्षमतेपेक्षा जास्त मागे वाकवू नका. काही क्षण या स्थितीत राहिल्यानंतर सावकाश पूर्वस्थितीत या. नियमित सरावामुळे पाठीच्या स्नायूंना स्ट्रेच मिळण्यास आणि पोश्चर सुधारण्यास मदत होऊ शकते.
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन हे बसून केले जाणारे स्ट्रेचिंग आसन आहे. दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांच्या पाठीला, कंबरेला आणि पायांच्या मागील स्नायूंना स्ट्रेच देण्यासाठी हे आसन केले जाऊ शकते. यासाठी जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. पाठीचा कणा सरळ ठेवत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना हळूहळू शरीर पुढच्या दिशेने झुकवा. हातांनी पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा; मात्र शरीरावर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण देऊ नका. सुरुवातीला पायाच्या बोटांपर्यंत हात पोहोचत नसतील तर जितके सहज शक्य आहे तितकेच पुढे वाका. या आसनामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास आणि पाठीच्या भागातील ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.
कॅट-काऊ स्ट्रेच
पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठी कॅट-काऊ स्ट्रेच हा सोपा व्यायाम केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी हात आणि गुडघ्यांच्या आधारावर जमिनीवर या. हात खांद्यांच्या सरळ खाली आणि गुडघे कंबरेच्या खाली असतील याची काळजी घ्या. श्वास घेताना पाठीला खालीच्या दिशेने हलका वळसा देत डोके वर करा. त्यानंतर श्वास सोडताना पाठीला गोलाकार करत हनुवटी छातीजवळ आणा. ही हालचाल सावकाश आणि नियंत्रित पद्धतीने पुन्हा पुन्हा करा. सतत बसून काम करणाऱ्यांना पाठीच्या कण्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि शरीरातील आखडलेपणा कमी करण्यासाठी या स्ट्रेचचा फायदा होऊ शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
दिवसभर सतत बसून काम करण्याऐवजी मध्येच उठून थोडे चालणे, शरीराची पोझिशन बदलणे आणि हलके स्ट्रेचिंग करणेही महत्त्वाचे आहे. योगासने करताना शरीरावर जबरदस्ती करू नये. वेदना, दुखापत किंवा अन्य आरोग्यविषयक समस्या असल्यास योगासने सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.