पांढरे केस होतील डार्क ब्राऊन! फक्त 3 गोष्टींपासून घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कलर

पांढरे केस दिसायला लागले की लगेच डाय लावता? थोडं थांबा! घरच्या घरी करता येणारा एक नैसर्गिक उपाय तुमच्या कामी येऊ शकतो. घरच्या घरी नॅचरल हेअर कलर कसा तयार करायचा, जाणून घ्या.

पांढरे केस होतील डार्क ब्राऊन! फक्त 3 गोष्टींपासून घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कलर
| Edited By: | Updated on: Sep 28, 2026 | 3:21 PM

पांढरे केस दिसायला लागल्यानंतर ते लपवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे हेअर डाय, कलर आणि घरगुती उपाय करून पाहतात. मात्र, प्रत्येक वेळी अपेक्षित रंग मिळेलच असे नाही. काही नैसर्गिक उपायांमुळे केसांना हलका रंग येतो, तर काहींचा रंग फार काळ टिकत नाही. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा केसांना कलर करण्याची गरज भासते. सतत हेअर कलर करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने पांढरे केस झाकण्याचा पर्याय शोधत असाल, तर हा उपाय तुमच्या उपयोगी येऊ शकतो. घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांच्या मदतीने हा हेअर कलर तयार करता येतो. योग्य पद्धतीने वापर केल्यास पांढऱ्या केसांना ब्राऊन शेड मिळण्यास मदत होऊ शकते. हा नैसर्गिक कलर तयार करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात, तो कसा तयार करायचा आणि केसांना कसा लावायचा, जाणून घेऊया.

हेअर कलर तयार करण्यासाठी लागणार ‘या’ 3 गोष्टी

Loading...

पांढऱ्या केसांना ब्राऊन शेड देण्यासाठी घरच्या घरी हा नैसर्गिक हेअर कलर तयार करता येतो. यासाठी बाजारात सहज मिळणारे तीन प्रमुख घटक आवश्यक आहेत. त्यांचे योग्य प्रमाण ठेवणे महत्त्वाचे आहे.
• हिना पावडर – १/३ कप
• इंडिगो पावडर – २/३ कप
• आवळा पावडर – १ चमचा
• गरम पाणी – गरजेनुसार

कसा तयार करायचा नॅचरल हेअर कलर?

सर्वप्रथम चांगल्या दर्जाची शुद्ध हिना पावडर घेऊन त्यातील एक तृतीयांश कप पावडर एका भांड्यात घ्या. त्यात गरम पाणी घाला आणि त्याची स्मूद पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये आवळा पावडर मिसळून झाकून ठेवा. हे मिश्रण साधारण ५ तासांपेक्षा जास्त वेळ भिजू द्या, जेणेकरून हिनाचा रंग व्यवस्थित बाहेर येईल.
मिश्रणाचा रंग चांगला तयार झाल्यानंतर केसांना कलर लावण्याच्या अगदी आधी इंडिगो पावडर घ्या. त्यासाठी दोन तृतीयांश कप इंडिगो पावडरमध्ये गरम पाणी घालून पेस्ट तयार करा. इंडिगो पावडर आधीपासून पाण्यात भिजवून ठेवू नका, कारण त्याचा रंग लवकर बाहेर पडतो. केसांना कलर लावण्याच्या वेळीच इंडिगोची पेस्ट तयार करून ती हिना-आवळ्याच्या मिश्रणात मिक्स करा.

केसांना कसा लावायचा?

केसांना हा नैसर्गिक कलर लावण्यापूर्वी केस स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडे असणे आवश्यक आहे. सुरुवातीला ज्या भागात पांढरे केस अधिक आहेत, त्या मुळांवर कलर व्यवस्थित लावा आणि त्यानंतर केसांच्या लांबीवर लावा. संपूर्ण केसांना कलर लावल्यानंतर तो साधारण एक ते दीड तास ठेवा. साध्या हिनाप्रमाणे हा कलर चार तास ठेवण्याची गरज नाही. ठराविक वेळेनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.
कलर केल्यानंतर लगेच शॅम्पू करू नका. दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांनी शॅम्पू करणे योग्य ठरेल. यामुळे केसांवर रंग व्यवस्थित सेट होण्यास वेळ मिळतो. तसेच, केसांना हा कलर लावण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करून कोणतीही अॅलर्जी किंवा जळजळ होत नाही ना, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us