उपवासात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? ट्राय करा भगरचे आप्पे, झटपट तयार होते रेसिपी
Navratri Fasting Recipe: नवरात्रीत नऊ दिवस उपवास करताना रोज काय खायचे हा प्रश्न पडतो. साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा भगरचे आप्पे ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा खिचडी, वडे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करा. उपवासाच्या ९ दिवस रोज वेगळे काय खायचे हा मोठा प्रश्न असतो. शिवाय अनेकांना साबुदाणा वडा, चिप्स, फ्राईज असे तळलेले पदार्थ खाणे टाळायचे असते. तुम्हाला सुद्धा त्याच त्या पदार्थांचा कंटाळा आला असेल तर तुम्ही भगरचे आप्पे खाऊ शकता. हे आप्पे कमी तेलात तयार करता येतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी सुद्धा बनवून खाऊ शकता. विशेष म्हणजे हे आप्पे बनवणे खूप सोपे आहे आणि हे झटपट तयार होतात. चला तर मग जाणून घ्या उपवासासाठी भगरचे आप्पेची रेसिपी.
भगरचे आप्पे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
– १ वाटी भगर
– ३ उकडलेले बटाटे
– १०० ग्रॅम दही
– बारीक चिरलेली हिरवी मिरची
– बारीक किसलेले आले
– बारीक चिरलेली कोथिंबीर
– तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स
– काळी मिरी
– १ चमचा जिरे
– सैंधव मीठ
– तूप
भगरचे आप्पे बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम भगर ३ ते ४ तास भिजत ठेवा. ते भिजल्यावर पाण्याने चांगले धुवून बाजूला ठेवा. आता एका कढईत तूप गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घाला. सोबत बारीक कापलेले काजू, बदाम आणि किशमिश टाका आणि भाजून घ्या. उकळलेल्या बटाट्याचे साल काढून मॅश करा. आता हे कढईत टाकून मिक्स करा. त्यात सैंधव मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. जेव्हा बटाटे भाजून कढईला चिकटणे थांबले तेव्हा गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करा. शेवटी कोथिंबीर घाला. आता भिजवलेली भगर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. भगर बारीक करण्यासाठी त्यात दही वापरा. जेवढी भगर आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घ्या. यात काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. बॅटर तयार झाल्यावर त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवा. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बनवा. आप्पे पॅन गरम करून ते तुपाने ग्रीस करा. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. बटाट्याचे गोळे साच्यात ठेवा आणि वर तयार केलेले भगरचे बॅटर घाला. जेणेकरून हे पिठ बटाट्याला नीट कव्हर करेल. आता झाकण ठेवून शिजवा. अधून मधून पलटत राहा. सर्व बाजूंनी नीट शिजल्यावर आप्पे बाहेर काढा. तुमचे उपवासाचे भगरचे आप्पे तयार आहे.