पालकपासून बनवलेले ‘हे’ 4 चविष्ट पदार्थ तुम्हाला चवीसोबतच देतील भरपूर पोषण, जाणून घ्या सोपी रेसिपी
पालक ही पोषक तत्वांनी समृद्ध असलेली हिरवी भाजी आहे. तर या भाजी पासून अनेक चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवता येतात. चला तर मग आजच्या लेखात आपण पालकापासून बनवलेले 4 पदार्थांची रेसिपी जाणून घेऊयात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदूरस्त राहण्यासाठी आपण प्रत्येकजण घरगुती पदार्थांना जास्त प्राधान्य देत आहोत. तर आहारातही पोषणयुक्त तसेच अनेक जीवनसत्त्वे असलेले पदार्थांचा समावेश करतो. त्यातच हिरव्या पालेभाज्या निरोगी आहाराचा एक आवश्यक भाग मानल्या जातात. त्यापैकी पालक विविध प्रकारे आहारात सहजपणे समाविष्ट केला जाऊ शकतो. पालकामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर यांसारखी पोषक तत्वे असतात. पण तुम्ही रोज तीच पालकाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर पालकापासून तुम्ही उत्तम चवदार आणि भरपूर पोषण मिळणारे पदार्थ बनवू शकता.
पालकापासून बनवलेले पदार्थ तुम्ही नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा हलक्या नाश्ता म्हणून खाऊ शकता. चांगल्या प्रकारे बनवलेले पालकाचे हे पदार्थ चवदार आणि पौष्टिक दोन्ही आहे. आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे पालकाचा समावेश केल्याने तुमचे जेवण कंटाळवाणे होणार नाही. चला पालकापासून सहज बनवता येणाऱ्या काही आरोग्यदायी आणि चवदार रेसिपी, तसेच पालक खरेदी करताना आणि पदार्थ बनवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, हे जाणून घेऊयात.
पालक भाजी पासून बनवा हे 4 पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ
पालक बेसन चीला
बेसनमध्ये बारीक चिरलेला पालक, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि थोडे मीठ मिक्स करा. मिश्रण तयार करण्यासाठी त्यात पाणी टाका. तव्याला थोडे तेल लावा आणि त्यावर आता तयार पालक बेसन चिलाचे मिश्रण गोलाकार टाका. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. बेसनमधून प्रथिने मिळतात, तर पालकातून फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हा नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
पालक कॉर्न सँडविच
बारीक चिरलेला पालक आणि उकडलेले मका एकत्र मिक्स करा. त्यात थोडी काळी मिरी आणि मीठ टाका. हे मिश्रण गव्हाच्या ब्रेडमध्ये ठेवा आणि पॅनमध्ये किंवा सँडविच मेकरमध्ये सँडविच बेक करा. खाण्यासाठी तयार आहे पालक कॉर्न सँडविच. पालकातून जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात, तर मक्यातून कर्बोदके मिळतात. हे एक हलका नाश्ता म्हणून खाल्ले जाऊ शकते.
पालक भाजी सूप
एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परतून घ्या. त्यात चिरलेला पालक, गाजर आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या टाका चांगले परतून घ्या. आता यामध्ये पाणी टाकून चांगले शिजवा. भाज्या मऊ झाल्यावर सूप हलकेच गाळून घ्या. हे सूप प्यायल्याने फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे मिळू शकतात. हा एक हलका आणि पोटभरीचा पर्याय असू शकतो.
पालक आणि चणा कोशिंबीर
एका भांड्यात उकडलेले चणे आणि बारीक चिरलेली पालक एकत्र करा. त्यात काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस आणि थोडे मीठ टाका. तुम्ही वरून भाजलेले जिरे पूड टाकू शकता. चण्यांमधून प्रथिने आणि फायबर मिळतात, तर पालकातून अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हा एक झटपट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे.
पालक खरेदी करण्याची आणि साठवून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
पालक विकत घेताना ताजी हिरवी आणि जास्त न कोमेजलेली पाने निवडा. पिवळे किंवा काळे डाग असलेली, जास्त माती लागलेली किंवा खराब होत असलेली पाने टाळा.
वापरण्यापूर्वी त्यावरील घाण किंवा कचरा काढून टाकण्यासाठी पालक चांगली धुऊन घ्या. धुतल्यानंतर पालक पूर्णपणे कोरडी करा, एका स्वच्छ कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि फ्रिजमध्ये ठेवा. अशाने पालक जास्त दिवस साठवून ठेवता येतो. तसेच पालकचा वापर लवकर करणे उत्तम.
पालकापासून पदार्थ बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
स्वयंपाक करण्यापूर्वी पालक स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. पालक जास्त वेळ पाण्यात भिजवणे टाळा. पालकाचे पदार्थ बनवताना पालक खूप जास्त शिजवण्याची गरज नसते.
जास्त शिजवल्याने त्याची चव आणि काही पोषक तत्वे कमी होऊ शकतात. तसेच बनवलेले पदार्थ आरोग्यदायी ठेवण्यासाठी, तेल, मीठ आणि अतिरिक्त मसाल्यांचे प्रमाण मर्यादित ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)