टॉयलेट सीटपेक्षाही घाण असतात हॉटेल रूममधील या 5 वस्तू, प्रत्येकजण हमखास करतो वापर
Hotel Safety Tips : हॉटेलची खोली बाहेरून कितीही स्वच्छ आणि आकर्षक दिसत असली, तरी अनेकदा काही वस्तूंमध्ये सर्वाधिक घाण आणि जंतू लपलेले असतात. आज आपण सर्वात खराब वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत.

आपण काही कामानिमित्त एखाद्या शहरात जातो तेव्हा हॉटेलमध्ये मुक्काम करतो. मात्र हॉटेलची खोली बाहेरून कितीही स्वच्छ आणि आकर्षक दिसत असली, तरी अनेकदा काही वस्तूंमध्ये सर्वाधिक घाण आणि जंतू लपलेले असतात. बेडशीट, चमकदार आरसे, नीट ठेवलेले टॉवेल आणि सुगंधी वातावरण पाहून अनेकांना खोली खूप स्वच्छ आहे असं वाटतं, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते. विशेष म्हणजे हॉटेलमधील सर्वात घाणेरडी जागा नेहमीच बाथरूम असते असे नाही. काही अशा वस्तू असतात ज्या जवळपास प्रत्येक पाहुणा वापरतो, पण त्यांची नीट स्वच्छता केली जात नाही. अशाच वस्तूंची माहिती जाणून घेऊयात.
टीव्हीचा रिमोट
हॉटेलच्या खोलीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये टीव्हीच्या रिमोटचा समावेश आहे. जवळपास प्रत्येक गेस्ट तो हाताळतो, पण प्रत्येकजण हात धुवूनच तो वापरतो असे नाही. रिमोटवरील लहान बटणे आणि कोपरे यामुळे त्याची पूर्ण स्वच्छता करणे कठीण जाते. अनेकदा हाउसकीपिंग कर्मचारी घाईत फक्त वरवर साफसफाई करतात. त्यामुळे अन्नाचे डाग, शिंक, खोकला आणि घाणेरड्या हातांमधील जंतू बराच काळ त्यावर राहू शकतात. त्यामुळे खोलीत पोहोचताच रिमोट टिश्यू किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे गरजेचे आहे.
सजावटीच्या उशा आणि रंगीत कापड
बेडवर ठेवलेल्या सजावटीच्या उशा आणि रंगीत कापड हेही घाण असते. पांढऱ्या चादरी आणि उशीचे कव्हर नियमित बदलले जातात, पण सजावटीसाठी ठेवलेले कुशन आणि फॅब्रिक रनर अनेक दिवस न धुता वापरले जातात. लोक त्यावर बॅग ठेवतात, बूट ठेवतात आणि बाहेरचे कपडे घालून थेट त्यावर बसतात. त्यामुळे त्या खराब असतात.
इलेक्ट्रिक केतली आणि कॉफी मेकर
हॉटेलच्या खोलीतील इलेक्ट्रिक केतली किंवा कॉफी मेकरही खराब असू शकतो. अनेकांना वाटते की उकळते पाणी सर्व काही स्वच्छ करते, पण प्रत्यक्षात मशीनची स्वच्छता महत्त्वाची असते. अनेकदा या उपकरणांची नियमित साफसफाई होत नाही, त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी तयार होऊ शकते.
पाण्याचा ग्लास
बाथरूमजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लासही नेहमी सुरक्षित असेलच असे नाही. अनेक ठिकाणी ग्लास व्यवस्थित डिसइन्फेक्ट न करता फक्त पाण्याने धुतला जातो. कधी-कधी खोलीतील इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरलेलेच कापड ग्लाससाठीही वापरले जाते. त्यामुळे अनेकजण हॉटेलमधील ग्लास वापरण्यापूर्वी स्वतः धुतात किंवा फक्त सीलबंद बाटलीतील पाणी पिणे पसंत करतात. याशिवाय लाईट स्विच, दरवाज्यांचे हँडल, फोन, पडद्यांचे हँडल आणि बेडजवळील लहान बटणे यांसारख्या वस्तूंनाही अनेक लोक सतत स्पर्श करतात, या वस्तूही खराब असतात.