Yoga For Women : मन प्रसन्न ठेवण्यासाठी महिलांनी रोज करावी ही तीन योगासनं
Yoga For Women : घर आणि नोकरी अशा दुहेरी भुमिका निभावताना महिलांना स्वतःची काळजी घ्यायला फारसा वेळ मिळत नाही. अनेक महिला या सतत तणावाखाली जगत असतात. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगासन उत्तम पर्याय ठरू शकते. महिलांनी रोज थोडा वेळ काढून ही ३ योगासनं करावीत.

एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतात. घर, कुटूंब, नाते, करिअर, पर्सनल गोल्स यांचे योग्य संतुलन साधणे म्हणजे तारेवरची कसरत असते. सततचे व्यस्त वेळापत्रक आणि वाढलेला ताण यामुळे मानसिक थकवा, चिंता, भावनिक असंतुलन निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योगासन हे एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग ठरू शकते.
दररोज काही विशिष्ट योगासनांचा सराव केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत होते. महिला दररोज ३ योगासनं करून तणाव कमी करू शकतात आणि मन प्रसन्न ठेवू शकतात. चला तर मग जाणून घ्या ही योगासनं कोणती आहेत.
गरुडासन
दररोज गरुडासन केल्याने एकाग्रता वाढण्यास, मन शांत व स्थिर ठेवण्यास आणि शरीराचा तोल सुधारण्यास मदत होते. त्यामुळे महिलांनी दररोज या योगासनाचा सराव करावा. हे योगासन करण्यासाठी सरळ उभे राहा. नंतर तुमचा एक पाय दुसऱ्या पायावरून क्रॉस करा. याच पद्धतीने हातांदेखील एकमेकांवर क्रॉस करून तळवे जोडण्याचा प्रयत्न करा. आता नजर समोरच्या एखाद्या बिंदूवर केंद्रित करा. या आसनात काही वेळ राहा आणि नंतर पूर्ववत उभे राहा. या आसनाचा सराव हळूहळू करा. आसन करताना शरीरावर अतिरिक्त दाब देऊ नका.
शशांकासन
हे आसन मानसिक ताण कमी करते, मनाला शांत व रिलॅक्स करते आणि खांदे व पाठीतील ताण कमी करते. शशांकासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसा. आता हळू हळू पुढे वाका. दोन्ही हात समोर पसरवा आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सामान्य गतीने श्वास घेत रहा. हे आसन करताना गुडघ्यांवर जास्त दाब देऊ नका.
उत्तानासन
दररोज उत्तानासन केल्याने मज्जासंस्था शांत होते, मानसिक स्पष्टता व आराम मिळतो आणि मान व खांद्यांमधील ताण कमी होतो. हे योगासन करण्यासाठी आधी सरळ उभे राहा. आता तुमचे पाय हिप्सच्या रुंदीइतके अंतर ठेवून उभे राहा. कमरेतून हळूहळू पुढे वाका आणि शरीर सैल सोडा. या आसनात काही वेळ थांबा आणि मग परत सरळ उभे राहा. या योगासनाची अनेक वेळा पुनरावृत्ती करू शकता. हे आसन करताना वाकताना अजिबात घाई करू नका. जास्त त्रास होत असेल, गरज वाटत असेल तर तुम्ही तुमचे गुडघे थोडेसे वाकवू शकता.