मुंबई: पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील (Panchayat Samiti) 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी (By election) 5 जून रोजी मतदान होत आहे तर 6 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राह्मणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होणार आहे.
संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत लागू असणार आहे.
या निवडणुकीसाठीचे नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे या कालावधीत दाखल करता येणार आहे. तर निवडणूक आयोगाकडून 22 मे रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टी दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे रोजी होणार असून 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 6 जून रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पोटनिवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता ही निवडणूक काळातील जे मतदारसंघ आहेत, आणि जे उमेदवारी असणार आहेत, त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे असेही कळविण्यात आले आहे.
पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार असले तरी स्थानिक पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ग्रामीण भागात मोठी चुरस दिसून येणार आहे.