AAP|ते फेसबुक लाईव्ह भोवले, आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावेंची पक्षातून हकालपट्टी; नेमके प्रकरण काय?

| Updated on: Jan 12, 2022 | 4:18 PM

राजकारण्यांची भाषा कशी असावी, असा वर्गही विधिमंडळात चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतरही अशी प्रकरणे होत आहेत.

AAP|ते फेसबुक लाईव्ह भोवले, आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावेंची पक्षातून हकालपट्टी; नेमके प्रकरण काय?
Jitendra Bhave
Follow us on

नाशिकः अखेर आम आदमी पक्षाचे (AAP) राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भावे यांनी केलेले फेसबुक लाईव्ह आणि त्यात त्यांनी वापरलेली भाषा वादग्रस्त ठरली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलन झाले. त्यामुळे शेवटी भावे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अखेर या साऱ्या प्रकरणाची दखल घेत आम आदमी पक्षाने भावेंची हकालपट्टी केली आहे. त्याचे आदेश आजच येऊन धडकल्याचे समजते.

नेमके प्रकरण काय?

सध्या राज्यभर वेगवेगळी पेपरफुटीप्रकरणे गाजत आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटकही करण्यात आली आहे. तसेच म्हाडा, टीईटी, आरोग्य भरती परीक्षा, एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे समोर आली. त्याची चर्चा झाली. विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यावरून टोकाचा असंतोष आहे. या साऱ्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी एक फेसबुक लाईव्ह केले होते. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर प्रहार केले होते. मात्र, आता यात वापरलेली भाषा त्यांच्या अंगलट आली आहे.

काय बोलले भावे?

फेसबुक लाईव्ह दरम्यान भावे यांनी महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना कामानिमित्त भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्या वेळ देत नसल्याचा आरोप केला. बर इतका उल्लेख करूनही ते थांबले नाहीत. त्यांनी धनगर यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सोबत इतर कर्मचाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. मात्र, या लाईव्हच्या दरम्यान त्यांचे भान सुटले. त्यांनी बोलताना काम जमत नसेल, तर घरी बसून धुणी भांडी करावीत, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाले. शेवटी भावेंसह त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. आता त्यांना पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अर्धनग्न आंदोलनामुळे चर्चेत

कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप करत नाशिकच्या नामांकित वोकार्ड हॉस्पिटलमध्ये जितेंद्र भावे यांनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. भावे आणि त्यांच्या समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्याप्रकरणी कलम 188 आणि बेकायदेशीररित्या गर्दी जमवणे या कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलनामुळेही ते चर्चेत राहिले होते.

अन्यथा होत्याचे नव्हते होते…

राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नेते यांची भाषा गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नारायण राणे यांना तुरुंगात जावे लागले. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेली घोषणाबाजीही अशीच वादग्रस्त ठरली होती. तिथून पुढे घडलेले सारे रामायण आपण पाहिले. इतकेच कशाला राजकारण्यांची भाषा कशी असावी, असा वर्गही विधिमंडळात चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतरही अशी प्रकरणे होत आहेत. मात्र, काही का असेना, बोलताना शब्द जपून वापरलेले बरे असते. अन्यथा क्षणात होत्याचे नव्हते होते. हे तितकेच खरे.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली