Tukaram Mundhe : छापेमारी, पाठलाग आणि धरपकड…महाराष्ट्राचा सिंघम तुकाराम मुंढेंनी Action सुरु करताच भेसळखोर हादरले, नुसती पळापळ

Tukaram Mundhe : तेल, तूप, पानमसाले, गुटखे बनवणारे, त्याचा भेसळ करणारे पार हादरुन गेले आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच थेट धडक कारवाई सुरु केली आहे. एका टोळीने एफडीएच्या धास्तीने तब्बल ३५० किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

Tukaram Mundhe : छापेमारी, पाठलाग आणि धरपकड...महाराष्ट्राचा सिंघम तुकाराम मुंढेंनी Action सुरु करताच भेसळखोर हादरले, नुसती पळापळ
IPS Tukaram mundhe
| Updated on: Jun 05, 2026 | 11:24 AM

IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच Action सुरु झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच ठाऊक आहे. नियमांवर चालणारा आणि कठोर शिस्तप्रिय अधिकारी ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या धडाक्याने भेसळखोर हादरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी धाडसत्र, छापेमारी सुरु आहे. तुकाराम मुंढे नियमांमध्ये कुठेही चालढकल करत नाही. कितीही दबाव आला तरी झुकत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत अनेकदा त्यांची बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यात ठिकठिकाणी कारवाई सुरु आहे. नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने स्वतंत्र कारवाई करण्यात आली.
नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली. 65 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त केला.

औषध विभागाने धंतोलीतील एका त्वचा, लेझर आणि केस प्रत्यारोपण केंद्रावर टाकलेल्या छाप्यात विनापरवाना औषध विक्रीच्या संशयावरून सात-आठ लाख रुपयांचा ऍलोपॅथिक औषध साठा जप्त केला. तर अन्न शाखेने एनर्झल या रेडी टू सर्व्ह न्यूट्रास्युटिकल आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांचा 58.42 लाख रुपयांचा साठा जप्त केलेला आहे. डायमंड वन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील न्यू रूट्स, स्किन, लेझर हेअर ट्रान्सप्लांट क्लीनिक येथे विनापरवाना औषध विक्री होत असल्याचा संशय एफडीएला होता. त्यानुसार बुधवारी एफडीएने नमुने चिकित्सालयावर छापा टाकला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍलोपॅथिक औषध साठा आढळून आला. रुग्णालयाकडे औषध खरेदी संबंधात खरेदीचे देयके, औषध विक्री परवाना देखील नसल्याचा तपासात समोर आलं

जालन्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

जालन्यातील तीर्थपुरी येथे तब्बल 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त केले. तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत होता. जालन्यातील तीर्थपुरी येथे तब्बल 13 लाखांचे 1 हजार 903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले. तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीज या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकला. यावेळी तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत असल्याच समोर आलं आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने हे दुकानाला सील ठोकल असून तुपाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

गोंदियात नियमबाह्य व संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोंदिया येथील पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून नियमबाह्य व संशायास्पद सोयाबीन तेलाचा मोठा साठा जप्त केला आहे. गोंदिया शहरातील नगर परिषद परिसरातील ‘मेसर्स गुरुनानक चिरोंजी भंडार’ या व्यावसायिक प्रतिष्ठानची अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी अचानक आणि सखोल तपासणी केली. सदर तपासणीची कारवाई ही आस्थापनेचे मालक किशोर कन्हैयालाल नागदेव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेले ’कुबेर’ ब्रँड चे रिफाइंड सोयाबीन तेल हे अन्न सुरक्षा मानकांनुसार अत्यंत निकृष्ट व अप्रमाणित असल्याचा तीव्र संशय पथकाला आला.

त्यातच सदर तेल रिपॅकिंग करण्यासाठी आधीच वापरण्यात आलेल्या जुन्या आणि दूषित टीनच्या डब्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचा संशय पथकाला आला. अशा जुन्या डब्याच्या पुनर्वापरामुळे खाद्यतेलामध्ये रासायनिक क्रिया इतर विषारी घटकांचे मिश्रण होण्याची भीती असते, जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत, अन्न सुरक्षा पथकाने ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन 688.4 किलो ग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जागीच जप्त केला. या जप्त केलेल्या मालाची किमत 1 लाख 37 हजार 680 रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या सोयाबीन तेलाचे अधिकृत अन्न नमुने कायद्यानुसार गोळा करण्यात आले असून ते पुढील रासायनिक विश्लेषणासाठी व प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

FDA कडून समृद्धी महामार्गावर 42 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई केली. इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाचा सावंगी ते माळीवाडा टोलनाक्यादरम्यान पाठलाग करून वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनातून सुमारे 42 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच 18 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण 60 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल ३५० किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून पळाले

पुणे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे अन्न आणि औषध प्रशासन एफडीएच्या धास्तीने तब्बल ३५० किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून टोळीने पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरसगाव काटा येथील एका शेताशेजारी हा मोठ्या प्रमाणावर खवा फेकून देण्यात आला होता. अन्न भेसळविरोधी पथक कारवाई करणार असल्याची कुणकुण लागताच, कारवाईच्या भीतीने अज्ञात इसमांनी हा साठा तिथेच फेकला आणि तिथून पळ काढला. ऐन सणासुदीच्या काळात किंवा वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा एवढा मोठा भेसळयुक्त खव्याचा साठा कुठे सप्लाय केला जाणार होता, याबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचा इंदापूरात गुटखा माफियांना दणका

इंदापूर शहरात अन्न व औषध प्रशासन आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. खाजगी होटल चालकाकडून यांच्याकडून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत एम सेंटेड तंबाखू विमल पानमसाला, डायरेक्टर पानमसाला प्रीमियम आरएमडी व्ही-1 तंबाखूसह विविध ब्रँडचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित मालाची किंमत 1 लाख 7 हजार 254 रुपये असून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. एकूण 2 लाख 57 हजार 254 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांच्या तक्रारीवरून 3 आरोपींविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संभाजी नगर गजानन नगरातील प्रसन्ना डेअरी अँड फूड्सवर FDAची धाड

छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन नगर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धाड टाकून संशयित गायीच्या तुपाचा साठा जप्त केला. प्रसन्ना डेअरी अँड फूड्स या आस्थापनावर छापा टाकून सैल स्वरूपातील (लूज) गायीचे तूप जप्त करण्यात आले. या प्रकरणी प्रमोद नाथा निमसे (वय 36) यांचे नाव समोर आले आहे. कारवाईदरम्यान सुमारे 18 हजार 150 रुपये किमतीचे संशयित तूप जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

Follow Us