Amravati Organ Donation : अंधारलेल्या आयुष्यात माणुसकीचा उजेड, अमरावतीच्या पल्लवी गडेकरने वाढदिवसानिमित्त केला अवयवदानाचा संकल्प

सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करून इतरांना जीवनदान देण्यास सहकार्य करावे, असा संदेश देत पल्लवीने समाजातील तरुण युवक युवतींना प्रेरणा देत एक आदर्श निर्माण केला.

Amravati Organ Donation : अंधारलेल्या आयुष्यात माणुसकीचा उजेड, अमरावतीच्या पल्लवी गडेकरने वाढदिवसानिमित्त केला अवयवदानाचा संकल्प
अमरावतीच्या पल्लवी गडेकरने वाढदिवसानिमित्त केला अवयवदानाचा संकल्प
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 2:58 PM

अमरावती : अवयवदानाची संकल्पना समाजात रुजावी करिता दिशा गृप (Disha Group) एज्युकेशन ऍण्ड इंटरनॅशनल आय बँकेच्या (Education and International eye Bank) माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. वास्तविक पाहता उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये हा आपला प्रयत्न असतो. परंतु अवयव, देहदान याला अपवाद. त्यामुळे हे दान प्रत्यक्ष होण्यापूर्वी परिचितांना माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून पल्लवी गडेकरने (Pallavi Gadekar) मोठ्या आनंदाने हा निर्णय परिजणांना सांगितला. खरं तर दानशूर असणं असं दुर्मिळ मानलं गेलंय. गरजूंना अन्न, पैसे, कपडे, शिक्षण, निवारा, नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असतात. पण तुमच्या आर्थिक, सामाजिक पातळीच्याही पलीकडे जाऊन केवळ मानव आहात म्हणून इतर मानवांकरिता देण्यासाठी तुमच्याकडे आहे ते अवयवदान. आयुष्याच्या वाटेत मृत्यू अटळ आहे. आपला मृत्यू कसा होईल, याची जाण आपल्याला नाही. त्यामुळे मरणोत्तर जर आपले अवयव कुणाच्या उपयोगी येत असेल, तर नक्कीच नेत्र दान आणि अवयवदान आपण केलेच पाहिजे असे पल्लवीला कायम वाटत होते. मात्र याला खरं वळण मिळाले ते तिच्या वडिलांमुळे.

वडिलांना ह्रदयरोगाने घेरले, ह्रदयाचा ठोका चुकला

यावेळी पल्लवी म्हणाली, बाबांनी अतोनात कष्ट केले. त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे. स्वतःच्या पायावर उभं राहावं. यासाठी ते कायम परिस्थितीशी संघर्ष आजही करीत आहे. या भाबळ्या आशेत त्यांनी स्वतःच्या आरोग्यावर दुर्लक्ष केले. यातच त्यांना हृदयरोगानी घेरले. तो काळ आमच्यासाठी कठीण होता त्या वेळी आलेले अनुभव हे खरंच खूप काही शिकवून गेले. ज्या हृदयात त्यांनी आपल्या मुलींना ठेवले, त्याच हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. आता ते ठणठणीत आहेत आणि असेच पुढे निरोगी राहोत. मात्र तो क्षण आजही आठवला की, आमच्या हृदयाचे ठोके वाढतात. माणसाच्या शरीरातला एक अवययव किती महत्वाचा असतो याची जाणीव त्यावेळी झाली. म्हणून त्याचवेळी ठरवलं की, आपल्या मृत्यूपश्चात अवयवदान करायचे. आता अवयवदान नेमके काय आहे कसे आहे. याची संपूर्ण माहिती दिशा गृप एज्युकेशन फाउंडेशन इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे यांच्या माध्यमातून सर्व माहिती मिळवून बाबांना सांगितली. आई-बाबांना माझा निर्णय खूप आवडला.

दिशा गृपतर्फे पल्लवीला प्रमाणपत्र

आपल्या अवयवांचे दान करूनच आपण कायम दुसऱ्या रूपाने जिवंत राहू शकतो. त्यामुळे सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करून इतरांना जीवनदान देण्यास सहकार्य करावे, असा संदेश देत पल्लवीने समाजातील तरुण युवक युवतींना प्रेरणा देत एक आदर्श निर्माण केला. तिच्या निर्णयाचे तिच्या आई वडिलांनी स्वागत केले. यावेळी अमरावती येथील दिशा गृप, एज्युकेशन फाउंडेशन इंटरनॅशनल आय बँकचे आय टेक्निशियन हिमांशु बंड यांच्या हस्ते पल्लवी गडेकर हिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिने केलेल्या संकल्पाचे दिशा आय बँकेचे अध्यक्ष कुंदा अरुण गावंडे, सचिव स्वप्नील अरुण गावंडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष तोटे यांनी पल्लवी गडेकर व तिच्या परिवाराचे कौतुक केले.