अवैध धंदे सुरू राहतात, मग अजितदादांच्या पुतळ्यासाठी परवानगीचा अडथळा कशाला? राष्ट्रवादीच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Anil Patil Slams Mahayuti Government: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. अजितदादांचा पुतळा उभारताना शासकीय अडथळे आल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

अवैध धंदे सुरू राहतात, मग अजितदादांच्या पुतळ्यासाठी परवानगीचा अडथळा कशाला? राष्ट्रवादीच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
| Updated on: Oct 25, 2026 | 6:03 PM

जळगावात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या पुतळ्याच्या उभारणीसाठी आलेल्या शासकीय अडचणींवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पुतळा उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या प्रक्रियेदरम्यान काही नकोशा गोष्टीही समोर आल्याचे सांगत त्यांनी शासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे, भाजपचे आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मंत्री आणि आमदारांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Loading...

पुतळा उभारण्यासाठी आलेल्या अडचणींबाबत बोलताना आमदार अनिल पाटील यांनी काही शासकीय अधिकाऱ्यांनी पुतळा बसवण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. एखाद्या पुतळ्यासाठी परवानगी मिळवताना जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो, असेही त्यांनी सांगितले. परवानगीसाठी लागणारा विलंब आणि कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अनिल पाटील यांनी अवैध धंद्यांचाही मुद्दा उपस्थित केला. सट्टा, पत्ता आणि दारू यांसारख्या अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी नसतानाही ते सुरू राहतात; मग अशा गोष्टींवर नियंत्रण कसे ठेवले जाते, असा सवाल त्यांनी केला. अजितदादांसारख्या नेत्याचा पुतळा उभारतानाही अडचणी येत असतील, तर विरोधाचा सामना करावा लागला तरी आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुतळा उभारणीसाठीच्या परवानगी प्रक्रियेचा आणि शासकीय अडथळ्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us