Sunetra Pawar : ‘दादांसारखी मी नाही’ सुनेत्रा वहिनी जे बोलल्या ते शब्द त्यांनी खरे करुन दाखवले, सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधात जाणाऱ्यांना दिला दणका
Sunetra Pawar : बारामतीमधल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. कारण साध्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सध्या बारामतीमध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळी सुरु आहे. बारामतीच राजकारण तापलं आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल, लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल आणि सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल असा सामना आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप हे अजितदादांचे विश्वासू होते. पण अजितदादांच्या पश्चात त्यांनी बंडखोरी केली. भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ उभं केलं. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांना इशारा दिला होता. “कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा.दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या.
आता त्यांनी त्यांचे शब्द खरे करुन दाखवले आहेत. निवडणुकीत अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभे करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला असून या घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सदस्यांची पक्षातून हकालपट्टी
साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या भूमिकेपासून दूर जात स्वतंत्र पॅनल उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.
अजित पवार गटासमोर नवे राजकीय आव्हान
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यापूर्वीच तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यात विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने अजित पवार गटासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. आता पक्षाने केलेल्या हकालपट्टीच्या कारवाईमुळे या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.