मोठी बातमी! वाहनधारकांना मोठा झटका, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू, पुण्यात CNG चे नवे दर काय?
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा देखील जाणवत आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहनधारकांच्या खिशावरील ताण वाढला आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे आखाती देशांमधून भारतात येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. काही ठिकाणी डिझेलची टंचाई जाणवत आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे कच्च तेल महाग झालं आहे, ज्याचा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.
पुण्यामध्ये पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे दर ९२ रुपये २५ पैशांवरून ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत. वाढलेले दर हे 27 मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करण्यात आल्याचं एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान आता सीएनजी दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार असून, त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरूच आहे.
दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करा, पेट्रोल, डिझेलची बचत करा असं आवाहन केलं होतं, त्यानंतर काही दिवसांमध्येच पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढवण्यात आले. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.